नागभीड येथे भव्य रक्षाबंधन सोहळा; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती.
_‘लाडक्या बहिणींसाठी सरकार खंबीरपणे उभे’ — माजी खासदार डॉ. अशोकजी नेते.
—————————————–
_‘बहिणींचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी ऊर्जा’ — आमदार बंटीभाऊ भांगडीया.

महिला भगिनींच्या स्नेह-आशीर्वादाने रंगला बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सोहळा; ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत
नागभीड | दि. ६ सप्टेंबर २०२६
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, तालुका नागभीड यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य प्रांगणात बहीण-भावाच्या पवित्र, अतूट आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा संदेश देणारा भव्य रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती लाभली.
ढोल-ताशांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मान्यवरांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ उर्फ किर्तीकुमार भांगडीया, नागपूरच्या स्थायी समिती सभापती शिवाणीताई दाणी, मेघाताई भांगडीया, अर्पणाताई भांगडीया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र शिंदे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा सावली साथ फाऊंडेशनचे संस्थापक रोहितभाऊ बोम्मावार, ओबीसी मोर्चाचे नेते तथा गुरुदेव भक्त व भाजपचे ज्येष्ठ नेते राजुभाऊ देवतळे, चिमूर विधानसभा क्षेत्राचे प्रमुख गणेश तर्वेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीशभाऊ वारजुरकर, नागभीड तालुका अध्यक्ष संतोष रडके, ज्येष्ठ नेते वसंत वारजुरकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णाभाऊ सहारे, जिल्हा संघटन महामंत्री तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजयजी गजपुरे, अमिर धमाणी, माजी जिल्हा परिषद सदस्या दिपाली मेश्राम, दिगंबर गुरपुडे, मोरेश्वर ठिकरे, हीरेजी, लांजेवारजी, होमदेव मेश्राम तसेच महिला मोर्चा नागभीड तालुका अध्यक्ष नीतूताई गुरपुडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होत्या.
‘लाडक्या बहिणींसाठी सरकार खंबीरपणे उभे’ — माजी खासदार डॉ. अशोकजी नेते
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, महाराष्ट्राचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिला भगिनी प्रेमाने ‘देवाभाऊ’ म्हणून संबोधतात. महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली असून, ही बाब आनंद आणि अभिमानाची आहे.
भारतीय जनता पार्टीच्या सरकारने महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, केंद्र व राज्य सरकार महिला भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या वतीने दरवर्षी रक्षाबंधनाचा हा सुंदर आणि स्नेहपूर्ण सोहळा आयोजित केला जातो. महिला भगिनींचे प्रेम, स्नेह आणि आशीर्वाद हीच या उत्सवाची खरी ताकद असल्याचे डॉ. नेते यांनी सांगितले.
“बंटीभाऊ भांगडीया यांच्या माध्यमातून चिमूर विधानसभा क्षेत्रात विकासाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा,” असे प्रतिपादन डॉ. अशोकजी नेते यांनी यावेळी केले.
‘बहिणींचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी ऊर्जा’ — आमदार बंटीभाऊ भांगडीया
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की, महिला भगिनींचे प्रेम, आशीर्वाद आणि ऊर्जा हीच माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी शक्ती राहिली आहे. माझ्या सर्व बहीण-भगिनींचे प्रेम व आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत.
घोडेझरी तलावाला गोसीखुर्द कालव्याचे पाणी आणण्याच्या कामाबाबत बोलताना आमदार भांगडीया म्हणाले की, मागील वर्षी याच मंचावरून त्यांनी हे काम करण्याचे आश्वासन दिले होते. विरोधकांनी हे काम शक्य नसल्याचे म्हटले; मात्र “मी ते करून दाखवले,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या कामासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी आणण्यात आला असून, कॅनल दुरुस्तीसाठी ३६ कोटी रुपये मंजूर करून आणण्यात आले आहेत. या कामाची निविदाही निघालेली आहे. तसेच शिवनाला कालवा टप्पा-२ पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे आमदार भांगडीया यांनी सांगितले.
“हा राजकीय मंच नाही; हा बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा आणि विश्वासाचा सोहळा आहे. मी आमदार असो किंवा नसो, रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्या बहिणींना कधीही विसरणार नाही. बहिणींचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे,” असे भावनिक प्रतिपादन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केले.
चित्राताई वाघ यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महिला भगिनींशी संवाद
या रक्षाबंधन सोहळ्याच्या मुख्य अतिथी भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ होत्या. मात्र पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे त्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. नागभीड येथील महिला भगिनींचा स्नेह आणि आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते लक्षात घेऊन चित्राताई वाघ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महिला भगिनींशी संवाद साधला आणि त्यांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
राखी बांधून जपला बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा धागा
यावेळी महिला भगिनींनी बंटीभाऊ व उपस्थिती मान्यवरांना राखी बांधून बहीण-भावाच्या प्रेम, विश्वास, आपुलकी आणि संरक्षणाच्या पवित्र नात्याला उजाळा दिला. राखी बांधण्याच्या या भावनिक क्षणी उपस्थित महिला भगिनींमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
स्नेह, आपुलकी, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या रक्षाबंधन सोहळ्यामुळे नागभीड येथे बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सुंदर आणि भावनिक आविष्कार पाहायला मिळाला. महिला भगिनींच्या प्रेमळ सहभागाने आणि मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा केवळ उत्सव न राहता सामाजिक स्नेह, विश्वास आणि बहीण-भावाच्या अतूट नात्याचा अविस्मरणीय सोहळा ठरला.

