एमआयडीसी(MIDC) भूसंपादनाविरोधात सर्वपक्षीय एकजुटीची हाक.
Oplus_131072
८ सप्टेंबरला चित्तरंजनपूर येथे सहविचार सभा; १३ गावांतील शेतकरी, शेतमजूर व नागरिकांना उपस्थितीचे आवाहन
गडचिरोली/चामोर्शी : येणापूर-जयरामपूर परिसरातील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी १३ गावांतील जमिनींच्या प्रस्तावित भूसंपादनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भूसंपादन कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी ८ सप्टेंबर रोजी चित्तरंजनपूर (येणापूर) येथे सर्वपक्षीय सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रस्तावित भूसंपादनामुळे शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि नागरिकांच्या शेती व उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, रोजगार, जलस्रोत, पर्यावरण आणि भविष्यातील पिढ्यांच्या प्रश्नावरही नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या ५ जून २०२६ रोजीच्या पत्रानुसार बाधित शेतकऱ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या अंतिम निर्णयापर्यंत भूसंपादनाची पुढील प्रक्रिया स्थगित ठेवण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरविण्यासाठी होणाऱ्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
१३ गावांच्या भूमिकेकडे लक्ष
८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता चित्तरंजनपूर येथे होणाऱ्या सभेत ‘१३ गावांचा निर्णय – प्रस्तावित भूसंपादन कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय भूमिका’ या विषयावर चर्चा होणार आहे. भूसंपादनाच्या प्रश्नावर विविध राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेण्यासोबतच शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सामूहिक निर्णय घेण्याचा प्रयत्न या बैठकीत केला जाणार आहे.
भूसंपादनाचा प्रश्न केवळ राजकीय मुद्दा न राहता १३ गावांच्या शेती, उपजीविका आणि भवितव्याशी संबंधित असल्याने सर्व राजकीय पक्षांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे.
या सभेला १३ गावांतील शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली भूमिका मांडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
