गडचिरोली–चामोर्शी महामार्गावर एसटी बस पलटी; नवीन पुलियाजवळ अपघात, प्रवासी गंभीर जखमी.
Oplus_131072
प्रशासनाची मदत पोहोचण्यापूर्वी नागरिकांनी धाव घेत केली बचावकार्य; सव्वातीन वाजता पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी
महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली; नागरिकांनी सुरू केले बचावकार्य, जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले
चामोर्शी : गडचिरोली–चामोर्शी महामार्ग क्रमांक ३५३ (सी) वर नवीन पुलियाच्या कडेला शुक्रवारी, दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास एसटी बस पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ तसेच महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाची मदत पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले. त्यामुळे जखमी प्रवाशांना तातडीने मदत मिळू शकली.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर सव्वातीन वाजताच्या सुमारास पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्याने जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, बसमध्ये एकूण किती प्रवासी होते आणि किती जण जखमी झाले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. अपघातानंतर महामार्गावर नागरिकांची गर्दी झाल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
दरम्यान, नवीन पुलियाजवळ वारंवार निर्माण होणाऱ्या सुरक्षिततेच्या प्रश्नाची संबंधित यंत्रणेने गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच पुलियाच्या कडील रस्त्याची स्थिती आणि अपघाताचे नेमके कारण तपासून आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
