एमआयडीसी (MIDC) भूसंपादनाविरोधात येनापूर येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन!
आष्टी येथे तहसीलचे अपर कार्यालय सुरू करण्याच्या मागणीसाठी बंदचे आवाहन; पोलिसांनी येनापूर येथे रोखला रस्ता, बसेस व ट्रकच्या रांगा, मात्र आंदोलकांनी रुग्णवाहिकेला दिला मोकळा मार्ग!


चामोर्शी(येणापूर) -आष्टी येथे तहसीलचे अपर कार्यालय सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी आष्टी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदच्या पार्श्वभूमीवर आष्टी येथे गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांनी येनापूर येथेच रस्ता अडविला. दरम्यान, येनापूर, गणपूर व मुधोली परिसरातील एमआयडीसी भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांनीही आज दि.२ नोव्हेबर रोजी १२:३० वाजता येनापूर येथे रास्ता रोको आंदोलन सुरू करून शेतजमीन अधिग्रहणाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.
या आंदोलनामुळे येनापूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. बसेस, ट्रकसह अन्य वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवासी आणि वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिका जात असल्याचे लक्षात येताच आंदोलकांनी तत्काळ रस्ता मोकळा करून रुग्णवाहिकेला मार्ग दिला.आष्टी येथे अपर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेला बंद आणि दुसरीकडे एमआयडीसी भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी केलेले रास्ता रोको आंदोलन, यामुळे येनापूर परिसरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या शेतीच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी रुग्णवाहिकेला मार्ग देत माणुसकीचे दर्शनही घडविले.

