तेली समाज वधू-वर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० युवक-युवतींची नोंदणी.
Oplus_131072
१०० वधू-वरांची प्रत्यक्ष, तर २०० जणांची ऑनलाइन नोंदणी; विवाहयोग्य युवक-युवतींना मिळाले स्थळ शोधण्याचे व्यासपीठ

चामोर्शी : तेली समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी एकाच व्यासपीठावर संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या वधू-वर व पालक परिचय नोंदणी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्थेच्या सौजन्याने रविवार, १ नोव्हेंबर रोजी इम्पेरियल मंगल कार्यालय, चामोर्शी येथे हा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात १०० वधू-वरांची प्रत्यक्ष, तर २०० जणांची ऑनलाइन अशा एकूण ३०० नोंदणी करण्यात आल्या.
मेळाव्यादरम्यान व्यासपीठावरून युवक-युवतींनी स्वतःचा परिचय करून दिला. त्यामुळे उपस्थित पालकांना संभाव्य स्थळांची माहिती जाणून घेण्याची आणि परस्पर संवाद साधण्याची संधी मिळाली. गडचिरोली जिल्ह्यातील तेली समाजातील शिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवतींना एकत्र आणून विवाह जुळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे (गडचिरोली) यांच्या हस्ते झाले. सहउद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिताताई मधुकर भांडेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा सावतेली समाजाचे सदस्य गजाननजी भांडेकर होते.
प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, इम्पेरियल फंक्शन हॉलचे मालक चुडाराम सातपुते, एम. डी. चलाख, तुळशीदास कुनघाडकर, दौलतराम कोठारे, राधेश्याम घोंगडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य स्थळांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, वेळ व खर्चाची बचत व्हावी, सामाजिक नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत आणि हुंडामुक्त विवाहपद्धतीला प्रोत्साहन मिळावे, या सामाजिक हेतूने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याच्या यशस्वितेसाठी द्वारकाप्रसाद सातपुते, अमोल कुकडकर, कृष्णा बोदलकर, द्रोणार्थ सातपुते, विवेक सातपुते, जिजाबाई सातपुते, आशिष चलाख, उष्टुजी चलाख, यशवंत भांडेकर, दिलीप उडान, सुनील जुवारे, मोरेश्वर कोठारे, गोपिचंद बोदलकर, पवन सातपुते यांच्यासह समाजातील युवकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक द्वारकाप्रसाद सातपुते यांनी केले. संचालन शिक्षक गजानन बारसागडे यांनी, तर आभार प्रदर्शन गोपिचंद बोदलकर यांनी केले.

