४० वर्षांच्या संघर्षानंतरही आष्टी तालुक्यापासून वंचित; शासनाच्या निर्णयाविरोधात आज बाजारपेठ बंद!
Oplus_131072
शासन आदेशातून आष्टीचे नाव वगळल्याने जनक्षोभ; तालुका निर्मिती संघर्ष समिती आक्रमक

गडचिरोली (आष्टी), दि. २ नोव्हेंबर : स्वतंत्र तालुका निर्मितीच्या मागणीसाठी गेल्या चार दशकांपासून सुरू असलेल्या आष्टीकरांच्या संघर्षाला आता आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रस्तावित अपर तालुक्याच्या यादीत समावेश असतानाही २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन आदेशातून आष्टीचे नाव वगळण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी आष्टी तालुका निर्मिती संघर्ष समितीच्या वतीने आज, सोमवार (२ नोव्हेंबर) रोजी संपूर्ण आष्टी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आष्टीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा, ही मागणी गेल्या ४० वर्षांपासून सातत्याने लावून धरण्यात येत आहे. परिसरातील गावांना प्रशासकीय कामांसाठी चामोर्शी येथे जावे लागत असल्याने नागरिकांना वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागतात. भौगोलिक अंतर आणि दळणवळणाच्या अडचणी लक्षात घेता आष्टी स्वतंत्र तालुका होणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, शासनाच्या प्रस्तावित अपर तालुक्याच्या प्रक्रियेत आष्टीचा समावेश झाल्याने तालुका निर्मितीची आशा पल्लवित झाली होती. मात्र, २२ सप्टेंबरच्या शासन आदेशातून आष्टीचे नाव वगळण्यात आल्याने नागरिकांची निराशा झाली आहे. चार दशकांच्या संघर्षानंतरही मागणीला न्याय मिळत नसल्याने शासनाच्या भूमिकेविरोधात जनतेत नाराजी वाढली आहे.
या निर्णयाच्या निषेधार्थ संघर्ष समितीने बंदची भूमिका घेतली असून व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक तसेच नागरिकांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आश्वासनांचे काय, न्याय मिळणार कधी?
चार दशकांपासून सुरू असलेल्या मागणीची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि आष्टीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे. आजच्या बाजारपेठ बंद आंदोलनातून आष्टीकरांचा असंतोष शासनापर्यंत पोहोचविण्याचा संघर्ष समितीचा प्रयत्न आहे. या आंदोलनाची शासन काय दखल घेते आणि तालुका निर्मितीचा प्रश्न कधी मार्गी लागतो, याकडे आष्टीसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

