आत्मसमर्पित माजी माओवादी सदस्यांसाठी जनजागरण मेळावे; पुनर्वसनासोबत रोजगार, आरोग्य व शासकीय योजनांची माहिती.
Oplus_131072
गडचिरोली : हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित माजी माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनाला चालना देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून ‘प्रोजेक्ट संजीवनी’अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत १५ सप्टेंबर रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयात, तर १७ सप्टेंबर रोजी प्राणहिता पोलीस उपमुख्यालय, अहेरी येथे जनजागरण मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यात आत्मसमर्पित सदस्यांना शासनाच्या पुनर्वसन धोरणाची माहिती देतानाच रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आत्मसमर्पणानंतर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच सामाजिक पुनर्वसनाच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या संधींची माहिती देण्यात आली.
मेळाव्यात लाभार्थ्यांना आधार कार्ड, ई-श्रम कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. तसेच शासनाच्या पुनर्वसन धोरणांतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुनर्वसन निधीचे धनादेश वितरित करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिरातून सहभागींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.
आत्मसमर्पित सदस्यांना समाजात सन्मानाने पुन्हा स्थिरावता यावे, त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित व स्थिर भवितव्य मिळावे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होता यावे, या उद्देशाने ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
पुनर्वसन, रोजगार आणि शासकीय सुविधांच्या माध्यमातून आत्मसमर्पित सदस्यांना स्वावलंबनाची संधी देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत असून, हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा संदेशही देण्यात आला.
