अभिजित दिपके यांच्या पाहणीत एटापल्लीतील शिक्षणव्यवस्थेचे धक्कादायक वास्तव उघड.
Oplus_131072
जंगलवाटेने तीन किलोमीटर पायपीट करून शाळा; एटापल्लीतील शिक्षणव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
कुठे शिक्षकांची कमतरता, तर कुठे अपुऱ्या वर्गखोल्या; अभिजित दिपके यांच्या शाळा पाहणीत धक्कादायक वास्तव समोर
गडचिरोली( एटापल्ली) : आदिवासीबहुल आणि अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष स्थिती शिक्षणव्यवस्थेतील अनेक प्रश्न अधोरेखित करणारी ठरली आहे. ‘काक्रोज जनता पार्टी (सीजेपी)’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी गुरुवारी तालुक्यातील कोसा आलेंगा, कोहका आणि इम्मे येथील शाळांना भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिक्षकांची कमतरता आणि मूलभूत सुविधांचा अभाव यांचे चित्र समोर आले.
कोसा आलेंगा येथे शाळेची इमारत उपलब्ध असतानाही शिक्षक नसल्याने तीन विद्यार्थिनींना तब्बल तीन किलोमीटर अंतर जंगलवाटेने पार करून कोहका येथील शाळेत जावे लागत असल्याचे पाहणीत समोर आले. परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
कोहका येथील शाळेत २७ विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन शिक्षक कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग एकाच खोलीत भरविले जात असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि स्वतंत्र शैक्षणिक वातावरण मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
इम्मे शाळेत ४७ विद्यार्थ्यांसाठी दोनच वर्गखोल्या
इम्मे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ४७ विद्यार्थी, दोन वर्गखोल्या, दोन शिक्षक आणि एक मुख्याध्यापक अशी स्थिती असल्याचे पाहणीत समोर आले. वर्गखोल्यांमध्ये पंख्यांची सुविधा नसताना कार्यालयात पंखा असल्याचेही निदर्शनास आले.
दरम्यान, २०२३ मध्ये शाळेची इमारत जीर्ण झाल्याने ती निर्लेखित करण्याबाबत पत्र देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा दावा करण्यात आला. शाळेच्या स्वच्छतागृहाची मागणीही गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
पाण्याची सुविधा देण्यासाठी दोन वर्षे का लागली?
अभिजित दिपके यांच्या शाळा भेटीच्या एक दिवस आधी पिण्याच्या पाण्यासाठी नळाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावर दिपके यांनी, एखादी सुविधा एका दिवसात उपलब्ध होऊ शकते, तर ती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन वर्षे प्रतीक्षा का करावी लागली, असा सवाल उपस्थित केला. पोषण आहाराची व्यवस्था समाधानकारक असल्याचे नमूद करतानाच कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प मानधनाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
‘जंगलवाटेने येणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला तर जबाबदार कोण?’
शाळांची पाहणी केल्यानंतर अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाला सवाल केला. जंगलातून शाळेत ये-जा करताना एखाद्या विद्यार्थ्यावर वन्यप्राण्याचा हल्ला झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित शाळा, पुरेसे शिक्षक, आवश्यक वर्गखोल्या, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
एटापल्लीतील या शाळांच्या पाहणीतून शिक्षणाचा हक्क केवळ शाळेच्या इमारतीपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा प्रत्यक्षात मिळणे गरजेचे असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता शिक्षण विभाग या समस्यांवर कोणती कार्यवाही करतो, याकडे पालक आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
