वडसा येथे २० सप्टेंबरला निःशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिर डॉ. अनिरुद्ध वनकर देणार नवोदित कलावंतांना अभिनयाचे धडे; २० ते २५ शिबिरार्थींची निवड.
देसाईगंज (वडसा), दि. १८ : गडचिरोली जिल्ह्यातील नवोदित कलावंत व विद्यार्थ्यांना रंगभूमीवरील तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा आणि अभिनय क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने लोकजागृती संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने २० सप्टेंबर २०२६ रोजी एकदिवसीय निःशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाट्यकलावंत, गायक, अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता डॉ. अनिरुद्ध वनकर यांचे शिबिरार्थींना प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यशाळेत व्हॉइस अँड स्पीच, बॉडी मुव्हमेंट, इम्प्रोव्हायझेशन, इम्पल्स, कम्युनिकेशन, म्युझिक अँड साँग तसेच अभिनय कौशल्य याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. १२ ते ५५ वर्षे वयोगटातील इच्छुक नवोदित कलाकारांना या शिबिरात सहभागी होता येणार असून केवळ २० ते २५ शिबिरार्थींची निवड करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यासह झाडीपट्टी आणि पूर्व विदर्भातील विद्यार्थ्यांनी व नवोदित कलाकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रंगभूमीवर काम करताना येणाऱ्या अडचणी दूर करून कलाकारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेने सांगितले.
शिबिरासाठी प्रवेश घेण्यासाठी विपिन राऊत (७०२०२४९८९०) व अंकुश शेडमाके (८९९९३९३१२८) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच आदर्श महाविद्यालयात वेळेवर उपस्थित राहून प्रवेश घेता येणार आहे. नवोदित कलावंतांनी या निःशुल्क प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन लोकजागृती संस्थेचे अध्यक्ष तथा निर्माता-दिग्दर्शक डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी केले आहे.
