आष्टीच्या हक्कासाठी बाजारपेठ ठप्प! अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीने आंदोलन पेटले.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

२२ सप्टेंबरच्या शासन परिपत्रकातून आष्टीचे नाव वगळल्याचा तीव्र निषेध; सर्वपक्षीय संघर्ष समितीचा शासनाला निर्वाणीचा इशारा

आष्टी, दि. २ नोव्हेंबर : आष्टीला अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याच्या मागणीने आता पुन्हा जोर धरला असून, शासनाच्या  दुजाभावाविरोधात सोमवारी आष्टी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. २२ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकातून प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयांच्या यादीतून आष्टीचे नाव वगळण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आष्टी तालुका निर्मिती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी, नागरिक आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला.

आष्टीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा, ही मागणी १९९६ पासून प्रलंबित आहे. गेल्या तीन दशकांपासून विविध आंदोलने, मोर्चे आणि निवेदनांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात शासनाकडून गडचिरोली जिल्ह्यातील आष्टीसह मालेवाडा, कसनसूर, पेंढरी, असरअल्ली आणि जिमलगट्टा येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यास मान्यता मिळाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आष्टीवासीयांच्या आशा उंचावल्या होत्या.

मात्र, २२ सप्टेंबरच्या शासन परिपत्रकात आष्टीचे नाव वगळण्यात आल्याने स्थानिक नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. तीन दशकांपासून तालुक्याच्या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या आष्टीकरांच्या पदरी पुन्हा निराशाच पडल्याची भावना व्यक्त होत आहे. याच अन्यायाच्या निषेधार्थ संघर्ष समितीने बाजारपेठ बंदचे आवाहन केले होते.

व्यापाऱ्यांचा कडकडीत बंदला पाठिंबा

संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. परिणामी, नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला. आष्टीला अप्पर तहसील कार्यालय तातडीने मंजूर करून शासन परिपत्रकातील वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आता आश्वासन नको, ठोस निर्णय हवा!

आष्टीच्या जनभावनांचा विचार करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. केवळ आश्वासनांवर वेळकाढूपणा न करता अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी. अन्यथा आगामी काळात आंदोलनाची व्याप्ती वाढवून तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आष्टी तालुका निर्मिती संघर्ष समितीने दिला आहे.

या बंद आंदोलनात दिलीप बारसागडे, संजय पंदिलवार, शरद कोलेटीवार, व्यंकटी बुर्ले, दिवाकर कुंदोजवार, अनिल आल्लूरवार, पराग गोनपल्लीवार, शंकर आक्रेडीवार, शंकर पाटील मारशेट्टीवार, रामचंद्र बामणकर, विनय येलमुले, नाना पसफुलवार, बंडू चापले, डी. डी. रॉय, अमित नगराळे, प्रशांत शिरपुरवार, बेबीताई बुरांडे, सत्यफुला डोर्लीकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!