अवैध दारू, ड्रग्ज व तंबाखू विक्रीविरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर; विक्रेत्यांवर तातडीने कारवाईचे तहसीलदार प्रशांत घोरूडे यांचे निर्देश.
Oplus_131072
तालुका मुक्तिपथ समितीच्या आढावा बैठकीत विविध विभागांना सूचना; शाळा, सार्वजनिक ठिकाणांपासून गावपातळीपर्यंत कारवाईचा निर्णय
चामोर्शी : तालुक्यातील अवैध दारूविक्री, ड्रग्ज तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार चामोर्शी तहसील कार्यालयात तहसीलदार तथा तालुकादंडाधिकारी प्रशांत घोरूडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका मुक्तिपथ समितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीत विविध विभागांच्या समन्वयातून व्यसनमुक्तीसाठी व्यापक मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
नगरपंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय कार्यालये, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणांच्या १०० यार्ड परिसरातील पानठेले हटविण्याची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. किराणा दुकानांमधून होणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीवरही संबंधित विभागांनी लक्ष ठेवून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
शाळा व महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्तीबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. तंबाखूचे सेवन करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या. या कारवाईचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले.
वाळवंटी चौक, आष्टी रोडवर विशेष लक्ष
चामोर्शी शहरातील वाळवंटी चौक व आष्टी रोड परिसरातील अवैध दारू व ड्रग्ज विक्रीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांसह संबंधित विभागांनी संयुक्तपणे कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावपातळीवरील ठोक दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करून त्याचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या.
गावांमध्ये अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी तंटामुक्ती समित्या व पोलीस पाटील यांच्यासाठी विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत समित्यांनी अधिक सक्रिय भूमिका बजावावी, अशा सूचना ग्रामविकास विभागाकडून देण्यात आल्या.
जंगलातील दारूभट्ट्यांवरही कारवाई
जंगल परिसरातील अवैध दारूभट्ट्या नष्ट करण्यासाठी वनविभागाने विशेष मोहीम राबवावी, तसेच अवैध जंगलतोड रोखण्यासाठी समन्वयाने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ‘उमेद’ अभियान व ‘माविम’च्या माध्यमातून महिलांमध्ये दारू व तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
गरोदर व स्तनदा मातांना बालकांमधील कर्करोगाच्या धोक्याबाबत माहिती देण्यासाठी आशा कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेण्याचे ठरले. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या व्यसनाधीन रुग्णांना मुक्तिपथ तालुका विलगीकरण केंद्रात समुपदेशनासाठी पाठविण्याचाही निर्णय घेण्यात आला.
बैठकीस पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. आशुतोष पाटील, नगरपंचायतीचे कर निरीक्षक मुरलीधर ठेंगरे, समुपदेशक पुरुषोत्तम घ्यार, राजेंद्र बल्लीवार, श्रीदेवी पुप्पालवार, डॉ. राजेश गजभे, मुक्तिपथचे तुषार येरेमळ, संघटक आनंद इंगळे, उपसंघटक आनंद सिडाम, विनोद पांडे, बाळोले, राजश्री रामटेके, पौर्णिमा खोब्रागडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
