गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी वार्तालाप माध्यम परिषदेचे आयोजन.
प्रेस नोट


गडचिरोली(4 नोव्हेंबर 2026):-
* विशेष पोलीस महानिरीक्षक (न.वि.अ) नागपूर संदीप पाटील यांच्यासह वरीष्ठ अधिकारी व माओवाद विषयावरील तज्ञ यांनी साधला संवाद
* गडचिरोली पोलीस दल व भारत सरकार पत्र व माहिती कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन
गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद आता संपूष्टात आला असून जिल्ह्रातील माओवादाची सद्यस्थिती, त्यामागील सामाजिक, राजकीय व भौगोलिक पाश्र्वभूमी, माओवादविरोधी अभियानातील विविध पैलू तसेच माओवादी चळवळ संपूष्टात आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न यावर सखोल चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल व भारत सरकार पत्र व माहिती कार्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 04 नोव्हेंबर 2026 रोजी पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे ‘माओवादमुक्त भारत’ या विषयावर पत्रकार बांधवांसोबत वार्तालाप माध्यम परिषदेचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान, नागपूर संदीप पाटील हे आभासी पद्धतीने तसेच पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र योगेश कुमार, पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच माओवाद विषयाचे अभ्यासक व तज्ज्ञ सहभागी झाले होते. यावेळी माओवादाची उत्पत्ती, विस्तार, सद्यस्थिती, माओवाद्यांची कार्यपद्धती, त्यांची विचारसरणी तसेच माओवादविरोधी अभियानादरम्यान येणारी आव्हाने आदी विविध विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. यासोबतच विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान, नागपूर संदीप पाटील यांनी सशस्त्र माओवादाच्या अस्तानंतर भविष्यात पोलीस दलापूढे असणारी आव्हाने या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र योगेश कुमार, पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश, जेष्ठ लेखक व पॉलीसी अॅनालिस्ट . पी. व्ही. रामना, जेष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे या माओवाद विषयाचे अभ्यासक व तज्ज्ञ यांनी आपले अनुभव, अभ्यासपूर्ण निरीक्षणे आणि महत्त्वपूर्ण विचार मांडले. या संवादातून गडचिरोली जिल्ह्यातील माओवादविरोधी संघर्षाचा प्रवास, पोलीस दलाने स्वीकारलेल्या विविध रणनीती, सुरक्षा यंत्रणांचे योगदान, स्थानिक नागरिकांचा सहभाग तसेच विकासात्मक उपक्रमांच्या माध्यमातून माओवादाचा प्रभाव कमी करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न यावर प्रकाश टाकण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद संपूष्टात आला असून भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस दल, शासन, माध्यमे आणि समाजातील विविध घटक यांच्यात समन्वय व सकारात्मक संवाद असणे आवश्यक असल्याचे या कार्यक्रमप्रसंगी अधोरेखित झाले. या अनुषंगाने माओवादविरोधी अभियानात आलेले अनुभव, यशस्वी कार्यपद्धती आणि भविष्यातील आव्हानांवरही यावेळी वरीष्ठ अधिकारी, तज्ञ व पत्रकार बांधवांच्या वतीने विचारमंथन करण्यात आले. पत्रकार बांधवांनीही आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून चर्चेत सक्रिय सहभाग नोंदविला. माओवादाच्या समस्येकडे केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि विकासात्मक दृष्टिकोनातूनही पाहण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. या वार्तालाप कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना माओवादाच्या समस्येची वस्तुनिष्ठ माहिती मिळण्यासोबतच नक्षलमुक्त भारताच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांची पाश्र्वभूमी, सद्यस्थिती आणि आगामी वाटचाल याबाबत सविस्तर जाणून घेण्याची संधी उपलब्ध झाली. यासोबतच या कार्यक्रमाच्या माध्यमातून माओवादविरोधी अभियानात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या 214 शहीद जवानांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (नविअ), नागपूर संदीप पाटील हे आभासी पद्धतीने तसेच पोलीस उप-महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र योगेश कुमार, पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., जेष्ठ लेखक व पॉलीसी अॅनालिस्ट पी. व्ही. रामना, जेष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे, भारत सरकार पत्र व माहिती कार्यालय, नागूपरचे सौरभ खेकडे व देवप्रकाश दुबे तसेच गडचिरोली जिल्ह्रातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

