ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेसह प्रलंबित प्रश्नांवर नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
महेंद्र ब्राह्मणवाडे यांची ओबीसी काँग्रेसच्या राष्ट्रीय व प्रदेशाध्यक्षांशी सदिच्छा भेट; संघटन बळकटीकरणावरही विचारमंथन.

नवी दिल्ली : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिल जय हिंदजी आणि महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांची महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील ओबीसी काँग्रेसची संघटनात्मक वाटचाल, संघटन बळकटीकरण तसेच ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ही प्रमुख मागणी ठामपणे मांडण्यात आली. तसेच ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय्य हक्क, अधिकार आणि प्रतिनिधित्व मिळावे, यासंदर्भातही चर्चा झाली. आगामी काळात ओबीसी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटनात्मक पातळीवर प्रभावीपणे काम करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
या भेटीप्रसंगी राष्ट्रीय समन्वयक अजय हटेवार, यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. सचिन नाईक, भूषण तल्हार, सचिन वैद्य, प्रमोद शिंगणे, नितीन डोंगरे, अमरावती समन्वयक कैलास काटे, नाशिक समन्वयक गौरव वाघ, नागपूर विभाग समन्वयक मोरेश्वर भादे यांच्यासह ओबीसी काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसी समाजाच्या हक्कांच्या लढ्याला संघटनात्मक बळ देणे आणि जातनिहाय जनगणनेसह प्रलंबित प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर प्रभावी व्यासपीठ मिळवून देणे, या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

