आष्टीतील शेतकऱ्यांचे २६ तासांपासून रास्ता रोको आंदोलन सुरूच; मुसळधार पावसातही आंदोलनाचा एल्गार.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासन धुडकावले; एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द केल्याशिवाय माघार नाही!
गणपूर, जयरामपूर, मुधोलीतील शेतकऱ्यांचाही लढ्याला पाठिंबा; शासनाच्या भूमिकेकडे लक्ष

चामोर्शी (आष्टी), दि. ३ नोव्हेंबर : एमआयडीसीसाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहणाच्या विरोधात आष्टी येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने आता निर्णायक संघर्षाचे रूप धारण केले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणण्याच्या आश्वासनापेक्षा जमीन अधिग्रहणाचा प्रस्तावच रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. ‘आधी एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करा, मगच पुढील चर्चा!’ असा ठाम पवित्रा घेत शेतकऱ्यांनी शासनाला थेट इशारा दिला आहे.
२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सुरू झालेले रास्ता रोको आंदोलन ३ नोव्हेंबरपर्यंत तब्बल २६ तासांहून अधिक काळ सुरू होते. मुसळधार पावसाची तमा न बाळगता शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले असून, ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘एमआयडीसी हटवा, शेतजमीन वाचवा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.
आश्वासन नको, निर्णय हवा!
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्री यांच्यासोबत भेट घडवून आणण्याचे आश्वासन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिले होते. मात्र, अद्याप ही भेट प्रत्यक्षात न झाल्याने आंदोलकांचा संयम सुटत चालला आहे. केवळ भेटीचे आश्वासन देऊन आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न मान्य नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणे मांडण्यापेक्षा शासनाने एमआयडीसीसाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण रद्द केल्याचा ठोस निर्णय जाहीर करावा, अशी त्यांची मागणी आहे.
पावसाच्या सरींनीही आंदोलनाची धग विझेना!
एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा आक्रमक निर्धार, असे चित्र आंदोलनस्थळी पाहायला मिळत आहे. पिढ्यान्पिढ्या कसलेल्या जमिनीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असताना विकासाच्या नावाखाली शेती हिरावून घेण्याचा प्रयत्न अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जमीन गेल्यास शेतीसोबतच उपजीविकेचा आधारही हिरावला जाईल, अशी भीती आंदोलक व्यक्त करीत आहेत.
तीन गावांचा पाठिंबा; आंदोलनाला व्यापक स्वरूप
आष्टीतील आंदोलनाला आता गणपूर, जयरामपूर आणि मुधोली परिसरातील शेतकऱ्यांनीही सक्रिय पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एमआयडीसीविरोधातील संघर्षाची व्याप्ती वाढत असून, हा लढा काही मोजक्या शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. यापूर्वी येनापूर व जयरामपूर परिसरात सुरू झालेल्या आंदोलनानंतर आता आष्टीतही रास्ता रोको सुरू झाल्याने जमीन अधिग्रहणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
रस्त्यावर वाहनांच्या रांगा; प्रशासनासमोर पेच
आंबेडकर चौकातील रास्ता रोकोमुळे आष्टी परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रवासी, वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आंदोलनस्थळी बंदोबस्त तैनात केला आहे.
प्रस्ताव रद्द करा, अन्यथा संघर्ष पेटणार!
एमआयडीसीसाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहणाचा निर्णय तातडीने रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कोणत्याही आश्वासनाला बळी न पडता जमीन वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
आता आष्टीतील आंदोलन केवळ रास्ता रोकोपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनले आहे. एका बाजूला शासनाचा औद्योगिकीकरणाचा प्रस्ताव, तर दुसऱ्या बाजूला आपली शेती वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलेले शेतकरी, असा संघर्ष उभा ठाकला आहे. शासन ठोस निर्णय घेणार की आश्वासनांच्या फेऱ्यांतच शेतकऱ्यांचा लढा अडकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

