मूलच्या वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा पुन्हा जिवंत करण्याची गरज- प्रज्योत रामटेके.
Oplus_131072
मूल | प्रतिनिधी :
मूलचा गणेशोत्सव म्हटला की जुन्या जाणत्या नागरिकांच्या आठवणी आजही ताज्या होतात. पूर्वीचा गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रबोधन, जनजागृती आणि कलात्मकतेचा अनोखा संगम होता. तत्कालीन सामाजिक व राजकीय घडामोडींचे जिवंत चित्रण देखाव्यांच्या माध्यमातून केले जात असे. हे देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याच्या आठवणी ज्येष्ठ नागरिक सांगतात.
पूर्वी गणेशोत्सवाच्या काळात सादर होणाऱ्या देखाव्यांमधून समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य केले जात होते. अन्याय, सामाजिक विषमता, देशभक्ती, स्वातंत्र्यलढा आणि जनजागृतीचे संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविले जात. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न राहता समाजाला विचार करायला लावणारा प्रबोधनाचा उत्सव ठरत होता.
मात्र, काळाच्या ओघात ही वैभवशाली परंपरा काही प्रमाणात लोप पावत असल्याची खंत व्यक्त होत आहे. प्रशासकीय नियम, विविध निर्बंध आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे पारंपरिक देखावे व प्रबोधनात्मक उपक्रमांना पूर्वीसारखे स्वरूप राहिले नसल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. मूलवासीयांनी आपला सांस्कृतिक वारसा आणि गणेशोत्सवाची ही समृद्ध परंपरा जपण्याची गरज निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजजागृती करणाऱ्या कलाकृती, देखावे आणि प्रबोधनपर उपक्रम पुन्हा एकदा जनसामान्यांसमोर यायला हवेत. नव्या पिढीला या परंपरेची ओळख करून देत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारे देखावे उभारण्याची गरज आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक सामाजिक स्वरूप देत विविध जाती-धर्मातील नागरिकांना एका व्यासपीठावर आणण्याचे कार्य केले. राष्ट्रीय एकात्मता, जनजागृती आणि स्वातंत्र्याची भावना जनमानसात रुजविण्यात या उत्सवाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
त्यामुळे मूलच्या गणेशोत्सवाची हरवलेली प्रबोधनाची परंपरा पुन्हा जिवंत करण्यासाठी गणेश मंडळे, नागरिक, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांनी सकारात्मक पुढाकार घेण्याची गरज आहे. गणेशोत्सव केवळ उत्सव न राहता समाजाला दिशा देणारा प्रबोधनाचा सोहळा बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया, अशी भावना व्यक्त होत आहे.
