सोनापूरात सिलिंडर स्फोट; सोमणकर कुटुंबाचे घर खाक, डॉ. अशोक नेते यांची मदतीसाठी धाव.
Oplus_131072
माजी खासदार डॉ. अशोक नेते यांची घटनास्थळी धाव; पीडित कुटुंबाला आर्थिक मदत, जखमींच्या उपचारांची घेतली माहिती

सोनापूर (ता. सावली, जि. चंद्रपूर), दि. १४ सप्टेंबर २०२६ :
सावली तालुक्यातील सोनापूर येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत बंडू सोमणकर यांचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून संसारोपयोगी साहित्य, कपडे, फर्निचर आणि अन्य वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेमुळे सोमणकर कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेत घरातील दोन नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी तत्काळ सोनापूर येथे धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच सोमणकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
डॉ. नेते यांनी पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत सुपूर्द केली. याशिवाय जखमींच्या उपचारांची माहिती घेत त्यांच्या आरोग्याबाबतही विचारपूस केली. संकटाच्या काळात पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात
दुर्घटनेची माहिती मिळताच कोणताही राजकीय भेद न ठेवता माणुसकीच्या नात्याने घटनास्थळी पोहोचत पीडित कुटुंबाला मदतीचा हात देण्यात आला. कुटुंबीयांना मानसिक आधार देतानाच जखमींच्या उपचारांची माहिती घेण्यात आली. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी तालुकाध्यक्ष अविनाश पाल, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर वाकुडकर, तालुका महामंत्री सचिन तंगडपल्लीवार, सावलीचे ठाणेदार पुल्लुरवार, नायब तहसीलदार मडावी, मुसळे, ज्येष्ठ नेते प्रकाश नागापुरे, डोनाळाचे उपसरपंच जितू सोनटक्के, सोनापूरचे उपसरपंच मुकेश भुरसे, युवा नेते सूरज किनेकर यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गॅस वापरताना नागरिकांनी दक्षता बाळगावी : डॉ. अशोक नेते
गॅस गळतीचा वास आल्यास नागरिकांनी तात्काळ रेग्युलेटर बंद करावा. अशावेळी घरातील विद्युत उपकरणे किंवा स्विच सुरू अथवा बंद करू नयेत. दरवाजे-खिडक्या उघडून घरातील गॅस बाहेर जाण्यासाठी हवा खेळती ठेवावी. तसेच गॅस पाईप, रेग्युलेटर आणि सिलिंडरची वेळोवेळी तपासणी करून सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन डॉ. अशोक नेते यांनी केले.
दरम्यान, दुर्घटनेतील नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून, पीडित सोमणकर कुटुंबाला शासकीय स्तरावरून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

