‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला गडचिरोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
जलसंधारण सप्ताहाचा उत्साहात समारोप; ‘पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा’चा संदेश
गडचिरोली |
जलसंधारण सप्ताहाच्या समारोपानिमित्त गडचिरोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ ला नागरिकांसह युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इंदिरा गांधी चौकातून सुरू झालेल्या या वॉकेथॉनला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. पोटेगाव येथील जिल्हा स्टेडियममध्ये वॉकेथॉनचा समारोप करण्यात आला.
१५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने ‘वॉक फॉर वॉटर’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून पाणी बचत, जलसंधारण आणि भविष्यातील पाणीटंचाईबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा प्रणिती निंबोरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश कोठेकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद घाडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा’ – डॉ. मिलिंद नरोटे
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी पाण्याचे योग्य नियोजन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, तुषार सिंचन यांसारख्या जलसंधारणाच्या उपाययोजना मोठ्या प्रमाणात राबविणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्हा सुजलाम्-सुफलाम् ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या कृतींतून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
जलसंवर्धन लोकचळवळ बनविण्याचे आवाहन
नगराध्यक्षा प्रणिती निंबोरकर यांनी भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच पाण्याचे संवर्धन आणि योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना लोकचळवळ बनवून प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, जलसंधारण विषयावरील रिल्स तयार करून पाठविण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाने केले आहे.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महा वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या युवक-युवतींमधून लकी ड्रॉद्वारे निवडलेल्या सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे शहरात पाणी बचतीबाबत जनजागृतीला चालना मिळाली.
