समतेशिवाय स्वातंत्र्याची कल्पना अशक्य; आल्लापल्ली येथे ‘उत्सव स्वातंत्र्याचा’ सोहळा उत्साहात.

0
IMG-20260816-WA0014
Spread the love

 

आल्लापल्ली, प्रतिनिधी दि. १५ ऑगस्ट : संघमित्रा बौद्ध विहार, आल्लापल्ली येथे वर्षावास प्रवचन मालिकेतील चौथे पुष्प ‘उत्सव स्वातंत्र्याचा’ हा कार्यक्रम शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) सायंकाळी धम्ममय वातावरणात उत्साहात पार पडला. यावेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्वातंत्र्य’ या विषयावर डॉ. प्रभाकर घोडेस्वार यांनी प्रभावी प्रवचनातून समता आणि स्वातंत्र्याचा परस्परसंबंध स्पष्ट केला.

कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित उपासक-उपासिकांनी सामूहिक त्रिशरण, पंचशील, भीमस्तुती व धम्मपालन गाथेचे वंदन केले. त्यानंतर आयु. जयंत गजभिये यांनी सुंदर भीमगीत सादर केले.

प्रवचनात डॉ. प्रभाकर घोडेस्वार यांनी “समतेशिवाय स्वातंत्र्याची कल्पना शक्य नाही” या भूमिकेवर सविस्तर भाष्य केले. १७५७च्या प्लासीच्या लढाईपासून ते चवदार तळे सत्याग्रह आणि काळाराम मंदिर मुक्ती संग्रामापर्यंतच्या विविध ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि मानवी प्रतिष्ठेबाबतची भूमिका उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडली.

IMG 20260816 WA0015

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. जेसिकाताई करमे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयु. इंदिराताई करमे यांनी केले. कार्यक्रमानंतर आयु. भीमराव झाडे व परिवाराच्या वतीने खीरदान करण्यात आले.

वर्षावासाच्या पवित्र पर्वानिमित्त आयोजित या धम्म प्रवचन मालिकेला बौद्ध बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, आल्लापल्ली; भारतीय बौद्ध महासभा, गडचिरोली (दक्षिण); महिला शाखा, भारतीय बौद्ध महासभा गडचिरोली (दक्षिण); भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा अहेरी; महामाया महिला मंडळ, आल्लापल्ली आणि बहुउद्देशीय महिला मंडळ, आल्लापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

संघमित्रा बौद्ध विहाराचे अध्यक्ष आयु. कार्तिक निमसरकार तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयु. बानयाजी दुर्गम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपासक-उपासिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मान्यवरांचा पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. ‘नमो बुद्धाय! जय भीम!’ या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!