जपतलाईतील मृत विद्यार्थिनींना गडचिरोलीत भावपूर्ण श्रद्धांजली; अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेसह सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांचा सहभाग.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती

 

गडचिरोली प्रतिनिधी : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मृत्यू पावलेल्या विद्यार्थिनींना गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात विविध आदिवासी व सामाजिक संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोली, एससी/एसटी विकास परिषद, GDTA, नारीशक्ती, जंगोरायताड तसेच अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित या श्रद्धांजली कार्यक्रमात मृत विद्यार्थिनींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून दिवंगत विद्यार्थिनींना श्रद्धांजली वाहिली. या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणण्यात आला.

यावेळी आश्रमशाळांमधील अनियमितता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा अभाव, मूलभूत सुविधांची कमतरता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष याकडे शासनाचे लक्ष वेधणारे फलक हातात घेण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, स्वच्छ व सुरक्षित परिसर, सर्पदंशासह आपत्कालीन परिस्थितीत तातडीची वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी, नियमित आरोग्य तपासणी आणि आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

राज्यातील सर्व शासकीय व खाजगी अनुदानित आश्रमशाळांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करावे, तसेच जपतलाई येथील घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी सामाजिक संघटनांनी केली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आश्रमशाळांमध्ये प्रभावी सुरक्षा यंत्रणा उभारण्याची गरजही उपस्थितांनी अधोरेखित केली.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, एससी/एसटी विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, GDTAचे डॉ. सचिन मडावी, आदिवासी विकास परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जंगोरायताडच्या अध्यक्ष आरती कोल्हे, नारीशक्तीच्या अध्यक्ष जयश्री येरमे, जिल्हा महासचिव उमेश उईके, सचिव सुरज मडावी, ओमकार वेटे, आशिष कुमरे, प्रदेश सचिव अमोल कुळमेथे, तालुका अध्यक्ष लिना कोकोडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“विद्यार्थ्यांचा जीव अमूल्य आहे; आश्रमशाळांमध्ये सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे,” असा ठाम संदेश देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!