जांभूळघाट आश्रमशाळेतील ५७२ विद्यार्थ्यांची गैरसोय उघड; महेंद्र ब्राम्हणवाडे यांची पाहणी.
जांभूळघाट आश्रमशाळेतील ५७२ विद्यार्थ्यांच्या सुविधांचा बोजवारा!

बेडअभावी विद्यार्थ्यांची फरफट; रिक्त पदे, स्वच्छता, आरोग्य आणि कर्मचाऱ्यांच्या व्यसनाचा मुद्दा गंभीर
गडचिरोली | चिमूर : जांभूळघाट येथील आश्रमशाळेत तब्बल ५७२ विद्यार्थी शिक्षण घेत असताना मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुरेसे बेड उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपावे लागत असल्याचे पाहणीत समोर आले. विशेषतः विद्यार्थिनींनाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांची माहिती मिळाल्यानंतर शेतकरी नेते महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आश्रमशाळेला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ३०० मुले आणि २७२ मुली अशा एकूण ५७२ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या निवास, भोजन, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांची त्यांनी पाहणी केली.
बेड नाहीत, विद्यार्थ्यांची जमिनीवर झोप
आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत बेडची व्यवस्था अपुरी असल्याचे निदर्शनास आले. परिणामी काही विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर असून, प्रशासनाने तातडीने पुरेशा संख्येने बेड उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ब्राम्हणवाडे यांनी केली.
विद्यार्थ्यांनी थेट मांडल्या समस्या
पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना निवासव्यवस्था, भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि शाळेतील अन्य अडचणी विद्यार्थ्यांनी मांडल्या. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियमित तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली.
रिक्त पदांमुळे अतिरिक्त कामाचा भार
आश्रमशाळेतील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज असल्याचेही यावेळी समोर आले. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विशेषतः एका अधीक्षकावर मोठ्या प्रमाणात कामाचा भार असल्याने मनुष्यबळ वाढविण्याची मागणी करण्यात आली.
कर्मचाऱ्यांच्या व्यसनाचा आरोप; चौकशीची मागणी
आश्रमशाळेतील काही कर्मचारी व्यसनाच्या आहारी गेल्याची माहिती समोर आल्याचा दावा ब्राम्हणवाडे यांनी केला. या आरोपांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची मागणी
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि आरोग्यावर सातत्याने देखरेख ठेवण्याची गरज असल्याचे ब्राम्हणवाडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही बाब दुर्लक्षित राहू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रशासनाच्या पाहणीवर प्रश्नचिन्ह
आश्रमशाळेतील समस्यांची माहिती प्रशासनाला असतानाही संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी का आले नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यात आला. याप्रकरणी ब्राम्हणवाडे यांनी विभागीय आयुक्त आयुषी सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आश्रमशाळेतील परिस्थितीची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली.
“५७२ विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि भवितव्याचा प्रश्न आहे. केवळ आश्वासन न देता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुविधा मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,” असा इशारा महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला.
यावेळी प्रमोद चौधरी, राजू कापसे, अविनाश अगडे, प्रशांत डवले, मिलिंद खोब्रागडे, अमोल मालके, रोहन नन्नावरे, कुंदन पडवेकर, निखिल करमेंगे, स्वप्नील दोन, हरीश मुळे, सूरज चौधरी, अमर नवघडे, हुकूमसिंग बागवान डहारे, समीर कुळमेथे, मधुकर मुंगले, ज्योतीताई मुंगले, मंजूताई रामटेके यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

