आंबोली, वायगाव, कन्हाळगावच्या पाणीप्रश्नाची प्रशासनाकडून दखल; प्रत्यक्ष पाहणीचे आदेश.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

नळ पाणीपुरवठा योजनांची होणार तपासणी; त्रुटी दूर करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

चामोर्शी : तालुक्यातील आंबोली, वायगाव आणि कन्हाळगाव येथील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न अखेर प्रशासनाच्या दारी पोहोचला आहे. नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तिन्ही गावांतील नळ पाणीपुरवठा योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या तीनही गावांतील पाणीटंचाईसदृश परिस्थिती आणि पाणीपुरवठ्यातील अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि अरुण कुकुडकर यांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर संबंधित विभागाने हालचाली सुरू करत योजनांच्या सद्यस्थितीची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी चामोर्शी येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना पत्र पाठवून आंबोली, वायगाव आणि कन्हाळगाव येथील योजनांची प्रत्यक्ष मौका चौकशी करण्यास सांगितले आहे. तपासणीदरम्यान आढळणाऱ्या त्रुटींच्या अनुषंगाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच पूरक कागदपत्रांसह सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या पत्राची प्रत आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित ग्रामस्थ प्रतिनिधींनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.

आदेश निघाले; आता नळाला पाणी कधी?

पाणी ही मूलभूत गरज असतानाही नियमित पुरवठा होत नसल्याने तिन्ही गावांतील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चौकशीच्या आदेशानंतर ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, केवळ कागदोपत्री तपासणी करून प्रश्न सुटणार नाही; योजनांमधील तांत्रिक किंवा प्रशासकीय त्रुटी शोधून त्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.

प्रशासनाच्या पाहणीत नेमक्या कोणत्या त्रुटी समोर येतात, त्यावर कोणती कार्यवाही केली जाते आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी किती वेळ लागतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

चौकशीच्या आदेशांपुरतीच कार्यवाही मर्यादित न राहता आंबोली, वायगाव आणि कन्हाळगाव येथील नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!