दोन वर्षांपासून रस्ता रखडला, मजुरांचे लाखो रुपये थकीत; आसा-कवठाराम मार्गाच्या कामाची चौकशीची मागणी.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

जिल्हा प्रतिनिधी | गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल आसा, नैनेर, कपेवंचा आणि कवठाराम या गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामावर राबलेल्या शेकडो आदिवासी मजुरांसह सुमारे २० ते २५ ट्रॅक्टरधारकांची लाखो रुपयांची मजुरी अद्याप थकीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रस्त्याच्या कामात कथित अनियमितता, निकृष्ट दर्जा आणि मजुरांच्या थकीत देयकांची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस नेते तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांनी केली आहे.
याप्रकरणी डॉ. कंकडालवार यांनी गडचिरोली येथे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
माती-मुरूम टाकून काम थांबले
आसा ते कवठाराम हा मार्ग परिसरातील नागरिकांसाठी दळणवळणाचा प्रमुख मार्ग आहे. अनेक वर्षांच्या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभाग आलापल्ली यांच्या माध्यमातून या रस्त्याला मंजुरी मिळाली. मात्र, काम सुरू झाल्यानंतर केवळ माती व मुरूम टाकण्यात आला आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम ठप्प झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
या कामासाठी परिसरातील ट्रॅक्टरधारकांनी अनेक महिने वाहने लावली, तर शेकडो मजुरांनी प्रतिकूल परिस्थितीत काम केले. मात्र, काम करून दोन वर्षे उलटूनही मजुरी व वाहनभाड्याची रक्कम मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
मजुरीसाठी मजुरांची कंत्राटदाराकडे फरफट
थकीत रक्कम मिळावी यासाठी मजूर आणि ट्रॅक्टरधारकांकडून संबंधित कंत्राटदाराकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्ष पैसे देण्याऐवजी केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कष्टकरी मजुरांमध्ये नाराजी वाढली आहे.
रस्ता अपूर्ण; पावसाळ्यात चार गावांचा संपर्क धोक्यात
रस्ता अपूर्ण राहिल्याने पावसाळ्यात आसा, नैनेर, कपेवंचा आणि कवठाराम या गावांचा संपर्क प्रभावित होतो. शाळकरी विद्यार्थी, गर्भवती महिला तसेच आजारी रुग्णांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
डॉ. कंकडालवार यांनी रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा, कथित गैरव्यवहार आणि मजुरांच्या थकीत मजुरीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच थकीत मजुरी व ट्रॅक्टरधारकांची देणी संबंधितांकडून वसूल करून तातडीने अदा करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
मजुरांची थकीत मजुरी अदा करून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले नाही, तर पीडित नागरिक, ट्रॅक्टरधारक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. गरज पडल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही डॉ. कंकडालवार यांनी दिला आहे.
आता प्रशासन या गंभीर तक्रारीची दखल घेऊन रस्त्याच्या कामाची चौकशी आणि प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित मजुरांना न्याय देणार का, याकडे चारही गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!