चामोर्शीत शेतकरी बचत गटाच्या साडेपाच लाखांवर चोरट्यांचा डल्ला!

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

‘शंभराची नोट पडली’ म्हणत लक्ष विचलित केले; दुचाकीवर ठेवलेली रोकड असलेली बॅग घेऊन चोरटे पसार

चामोर्शी | ७ ऑक्टोबर : शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी बँकेतून काढून आणलेली तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड दिवसाढवळ्या लंपास करण्यात आल्याने चामोर्शी शहरात खळबळ उडाली आहे. ‘तुमची शंभर रुपयांची नोट खाली पडली आहे’, असे सांगून लक्ष विचलित करण्यात आले आणि त्याच क्षणी साथीदाराने दुचाकीच्या टाकीवर ठेवलेली पैशांची बॅग घेऊन पोबारा केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जय गणेश शेतकरी पुरुष बचत गट, लखमापूर-बोरी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येणार होते. त्यासाठी गटाचे अध्यक्ष घनश्याम बोलीवार आणि सचिव रामचंद्र सत्तरवार हे चामोर्शी येथील बँक ऑफ इंडिया शाखेत आले होते. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास बँकेतून ५ लाख ५० हजार रुपये काढल्यानंतर दोघांनी ही रोकड बॅगेत ठेवली आणि दुचाकीने निघाले.

बसस्थानक परिसरातील सुमित मेडिकलजवळ ते थांबले असताना घनश्याम बोलीवार हे खरेदीसाठी दुकानात गेले. दरम्यान, रामचंद्र सत्तरवार हे बसस्थानकाच्या दिशेने जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना मागून आवाज देत, ‘तुमची शंभर रुपयांची नोट खाली पडली आहे’, असे सांगितले.

सत्तरवार यांनी मागे वळून नोट कुठे पडली आहे, हे पाहण्याचा प्रयत्न केला. याच क्षणाचा फायदा घेत चोरट्याच्या साथीदाराने दुचाकीच्या टाकीवर ठेवलेली ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग अलगद लंपास केली. काही क्षणांतच प्रकार लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संभाव्य मार्ग आणि संशयितांच्या हालचालींची माहिती तपासली जात आहे.

दिवसा वर्दळीच्या परिसरात शेतकऱ्यांच्या कर्जवाटपासाठी असलेली लाखो रुपयांची रोकड चोरीला गेल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!