वनपट्टे व घरकुलाच्या प्रश्नांसाठी आझाद(ASP) मैदानात .
मालेवाडा, मरेगाव, धनेगाव व फरी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाकडे पाठपुराव्याचे आश्वासन

कुरखेडा : वन हक्क पट्टे, घरकुलाचे प्रलंबित हप्ते आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी आजाद समाज पार्टीच्या वतीने मालेवाडा, मरेगाव, धनेगाव व फरी येथील नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागरिकांनी आपल्या विविध समस्या व प्रलंबित मागण्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
बैठकीदरम्यान वन हक्क पट्ट्यांच्या नोंदी, नवीन अर्ज, वन हक्क कायद्यानुसार आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तसेच ग्रामसभेच्या ठरावाची प्रक्रिया याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी संबंधित तलाठी वड्डे साहेब यांना बैठकस्थळी बोलावून त्यांच्याकडून नागरिकांच्या प्रश्नांवर थेट माहिती व उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी तलाठी वड्डे यांनी वन हक्क व संबंधित प्रशासकीय प्रक्रियेत नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, घरकुलाचे थकीत हप्ते अद्याप मिळाले नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घरकुल मंजूर होऊनही हप्ते वेळेवर मिळत नसल्याने अनेक लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. शासनाच्या योजनेचा लाभ कागदावर न राहता तो प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात वेळेत मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
*“वनपट्टे आणि घरकुल हे नागरिकांचे हक्काचे प्रश्न आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांना आपल्या हक्कासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. प्रत्येक पात्र नागरिकाला त्याचा हक्क मिळेपर्यंत आजाद समाज पार्टी शांत बसणार नाही,” असा निर्धार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नागरिकांच्या सर्व मागण्यांचा संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघर्ष करण्याचे आश्वासन आजाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. गरज पडल्यास नागरिकांच्या हक्कांसाठी प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या बैठकीस आजाद समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष चेतन काटेंगे, महासचिव अंकुश कोकोडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम, तालुका उपाध्यक्ष पितांबर हर्रो, प्रतिसरपंच नितेश गुरुनुले, संतोष मोहुर्ले, विनायक वाढगुरे आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

