लालडोंगरीतील गरिबांना घरकुलाचा आधार द्या – शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख पप्पी पठाण यांची मागणी

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

चामोर्शी : शहरातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत लालडोंगरी तसेच मटन मार्केट परिसरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) चामोर्शी तालुकाप्रमुख पप्पी पठाण यांनी केली आहे.

लालडोंगरी व मटन मार्केट परिसरातील काही कुटुंबे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असून, त्यांना आजही झोपड्या अथवा अपुऱ्या निवाऱ्याचा आधार घ्यावा लागत असल्याचे पठाण यांनी सांगितले. पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरणे, उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास आणि हिवाळ्यात थंडीचा सामना करावा लागत असल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी शासनाच्या विविध घरकुल योजना उपलब्ध असतानाही प्रभाग क्रमांक ५ मधील काही पात्र कुटुंबे अद्याप या योजनांच्या लाभापासून वंचित असल्याचा दावा पठाण यांनी केला. त्यामुळे चामोर्शी नगरपंचायत तसेच संबंधित विभागाने परिसरातील घरकुलवंचित कुटुंबांचे तातडीने सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करावी, अशी मागणी त्यांनी केली.

कागदोपत्री प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे पात्र कुटुंबे घरकुलाच्या लाभापासून वंचित राहू नयेत. अनेक वर्षांपासून या परिसरात वास्तव्यास असलेल्या गरजू कुटुंबांना सुरक्षित व कायमस्वरूपी निवारा मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी पप्पी पठाण यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!