टेंभा ग्रामपंचायतीच्या साहित्य खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह; लाखोंच्या व्यवहाराची चौकशी मागणी.

0
IMG-20261005-WA0193
Spread the love

शाळेला साहित्य दिल्याचे कागदोपत्री दाखविल्याचा आरोप; चौकशी करून दोषींवर कारवाईची छत्रपती सेनेची मागणी

 गडचिरोली

गडचिरोली पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या टेंभा ग्रामपंचायतीतील साहित्य खरेदी प्रकरणावरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेंभा येथे कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरओ यंत्रणा पुरविल्याचे ग्रामपंचायतीच्या नोंदीत दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, संबंधित साहित्य ग्रामपंचायतीने खरेदी करून दिले नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी आणि शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल करावी, अशी मागणी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंद कात्रटवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शाळेच्या माहितीतून वेगळे चित्र समोर

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीने शाळेला विविध साहित्य पुरविल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. मात्र, शाळा प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी माहितीनुसार संबंधित साहित्य वेगवेगळ्या माध्यमातून शाळेला प्राप्त झाले आहे.

कॉम्प्युटरची खरेदी शाळेने स्वतः केल्याचे, तर लॅपटॉपचा पुरवठा क्युरीयन सर्व्हिस मुंबई यांच्याकडून झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रोजेक्टर एलएलएफअंतर्गत प्राप्त झाला असून स्मार्ट टीव्ही डॉ. उमेश पी. समर्थ यांनी भेट म्हणून दिल्याचे सांगण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे श्री. मोहन के. ठाकरे यांनी दिल्याचेही शाळेच्या माहितीत नमूद आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची आरओ व्यवस्था एलएलएफ-सी (एनपीसीआय) अंतर्गत उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या साहित्याची ग्रामपंचायतीने खरेदी केल्याचे दाखवून निधीचा वापर करण्यात आला का, असा सवाल तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.

७ सप्टेंबरच्या तक्रारीनंतरही चौकशी प्रलंबित

या प्रकरणासंदर्भात टेंभा ग्रामस्थांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केल्याचे सांगण्यात आले. मात्र, तक्रार करूनही अद्याप ठोस चौकशी अथवा कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होऊ शकतात, अशी भूमिका तक्रारदारांनी घेतली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या संबंधित नोंदी, खरेदी प्रक्रिया, देयके, बिल-वाउचर तसेच शाळेकडील उपलब्ध नोंदींची पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी करण्यात आली आहे.

आठवडाभरात कारवाई न झाल्यास आंदोलन

टेंभा ग्रामपंचायतीतील साहित्य खरेदी प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास संबंधितांकडून वसुली करावी, अशी मागणी अरविंद कात्रटवार यांनी केली आहे.

आठवडाभरात प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यास छत्रपती सेनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयासमोर टेंभा येथील नागरिकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी कमलाकर पिठाले, हिराजी ठाकरे, गणेश वाघमारे, भारत नैताम, प्रफुल्ल डोईजड, चरण मुंघाटे, वेणुदास धारणे, रुपेश ठाकरे, शुभम अंबादे, प्रवीण गेडाम, योगीराज समर्थ, तुलाराम नैताम, लुमाजी मुंघाटे, देविदास कुमरे, लोकेश नैताम, पंकज नैताम, लंकेश राऊत, साहिल भोयर, रघुनाथ ठाकरे, राहुल ठाकरे, जगदीश मुंघाटे, दशरथ नारन्नवरे, पुरुषोत्तम गंडाटे, विष्णुदास कारमेंगे, समर कस्तुरे, सोहम उईके, ओम पेंदाम, वेदांत कस्तुरे, गजानन ठाकरे, चंद्रकांत कोलते, आशिष मुंघाटे आदी उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक असून, चौकशीतूनच साहित्य खरेदी, पुरवठा आणि निधीच्या वापराबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. तसेच संबंधित टेंभा ग्रामपंचायत प्रशासनाची बाजू समोर आल्यानंतरच आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष काढता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!