भेंडाळ्यात पुन्हा नळाच्या पाण्यात दोन नारू; पाणीपुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह.
Oplus_131072
काही दिवसांपूर्वीची घटना ताजी असतानाच पुन्हा प्रकार; ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांचा संताप

भेंडाळा : नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा व्यवस्थेची नियमित देखभाल व तपासणी होणे अपेक्षित असते. मात्र, भेंडाळा येथे नळाच्या पाण्यात चक्क दोन नारू आढळल्याने पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सूरज कोटांगले यांच्या घरातील नळाला आलेल्या पाण्यात दोन नारू आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून, पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच भेंडाळा परिसरात नळाच्या पाण्यात नारू आढळल्याची घटना समोर आली होती. त्यानंतरही पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नळाद्वारे घराघरात पोहोचणारे पाणी नागरिकांच्या दैनंदिन वापरात येते. त्यामुळे पाण्यात अशा प्रकारचे जीव आढळणे ही बाब केवळ दुर्लक्ष करण्यासारखी नसून, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर विषय असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
जलस्रोत आणि टाक्यांची तपासणी होते का?
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची, पाण्याच्या टाक्यांची, जलवाहिन्यांची तसेच पाणी शुद्धीकरण प्रक्रियेची नियमित तपासणी केली जाते का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पाणीपुरवठा यंत्रणेतील नेमक्या कोणत्या टप्प्यावर त्रुटी निर्माण होत आहे, याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नाकडे प्रशासनाने आणखी किती काळ दुर्लक्ष करायचे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामपंचायतीने तातडीने संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेची तपासणी करून पाण्याच्या टाक्या व जलवाहिन्यांची स्वच्छता करावी. तसेच पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, काही दिवसांच्या अंतराने पाण्यात नारू आढळण्याच्या घटना समोर येत असताना प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. या प्रकरणाची चौकशी करून पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात आणि नागरिकांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

