MRM ते CEIR; सायबर सुरक्षेचे धडे देत चामोर्शी पोलिसांची जनजागृती मोहीम.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

MRM ते CEIR; सायबर सुरक्षेचे धडे देत चामोर्शी पोलिसांची जनजागृती मोहीम

ऑनलाइन फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार करण्याचे आवाहन; म्युल अकाउंट, APK फाईल आणि मोबाईल ब्लॉकिंगची दिली माहिती

चामोर्शी : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावे आणि फसवणूक झाल्यास तातडीने योग्य ती कार्यवाही करता यावी, यासाठी चामोर्शी पोलिसांकडून सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पोलिस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड जवान तसेच नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत विविध माध्यमांची माहिती देण्यात आली.

पोलीस स्टेशन चामोर्शी येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी MRM पोर्टलबाबत सविस्तर माहिती दिली. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यानंतर तातडीने कोणती पावले उचलावीत, फसवणुकीतील रक्कम गोठविण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे आणि उपलब्ध यंत्रणांच्या माध्यमातून रक्कम परत मिळविण्यासाठी काय करावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

फसवणूक झाल्यानंतर विलंब न करता तक्रार दाखल करणे आणि व्यवहाराशी संबंधित पुरावे सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

मार्कंड मोहल्ल्यात नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे

जनजागृती मोहिमेअंतर्गत चामोर्शी पोलिसांच्या पथकाने सायंकाळी मौजा मार्कंड मोहल्ला येथील सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देत नागरिक व भाविकांशी संवाद साधला. यावेळी भावेश वरघंटीवार, शशी चिडे, मेजर पौर्णिमा चांहदे आणि सरक्का दुर्गम्म ठोंबरे यांनी नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाच्या उपाययोजना समजावून सांगितल्या.

Mule Account (म्युल खाते) म्हणजे काय, अनोळखी व्यक्तीकडून आलेली APK फाईल डाउनलोड केल्यास होणारे संभाव्य धोके, तसेच GRM/MRM पोर्टलचा वापर याबाबत नागरिकांना सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले.

मोबाईल फोन हरवला अथवा चोरीला गेल्यास CEIR पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल ब्लॉक करण्याची तसेच त्याचा शोध घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया याबाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली.

‘फसवणूक झाली तर घाबरू नका; वेळ दवडू नका!’

सायबर फसवणूक झाल्यानंतर घाबरून न जाता तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, व्यवहाराचे तपशील व उपलब्ध पुरावे जतन करावेत आणि विलंब न करता तक्रार नोंदवावी, असे आवाहन चामोर्शी पोलिसांनी केले.

अनोळखी लिंकवर क्लिक करणे, संशयास्पद APK फाईल डाउनलोड करणे, अनोळखी व्यक्तींना OTP, PIN किंवा इतर गोपनीय माहिती देणे टाळावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

‘सावधानता हीच सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षिततेची पहिली पायरी’ या उद्देशाने चामोर्शी पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू असून, गावोगावी आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!