पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला मतमोजणी.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; संबंधित मतदारसंघांत आचारसंहिता लागू

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीत औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपत असल्याने त्यापूर्वी नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी ही निवडणूक होत आहे.

२९ सप्टेंबरला अधिसूचना

निवडणूक कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर असून, ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे.

त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. २७ ऑक्टोबरला मतमोजणी करण्यात येणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

आचारसंहिता लागू; राजकीय हालचालींना वेग

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संबंधित पाचही मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.

निवडणुकीची घोषणा होताच संबंधित मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू होणार असून, अर्ज दाखल करणे, छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!