नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी विजयी.

0
IMG-20261029-WA0055
Spread the love

 

नागपूर, दि. २९ : नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळविला. त्यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची एकूण ६७ हजार २३१ मते मिळाली. तर त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे सुधाकर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी अभिजित वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले.

नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता ८४ टेबलवरून मतमोजणीला सुरुवात झाली. ४१ पेक्षा जास्त तासांपासून ही मतमोजणी सुरू होती. यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ.हर्षदीप कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, विभागातील सर्व जिल्ह्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक ७५ हजार ४३८ मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये १ लाख ६५ हजार ९०६ मतांपैकी १५ हजार ३२ मते अवैध ठरली. तर १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली.

द्वितीय पसंतीच्या बाद फेऱ्यामध्येही कुठल्याही उमेदवाराला निर्धारित कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पहिल्या व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरी मिळून सर्वाधिक ६७ हजार २३१ मते घेणाऱ्या अभिजित वंजारी यांना विजयी घोषीत करण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम २२ सप्टेंबर रोजी जाहीर केला होता. त्यानुसार २९ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी २७ ऑक्टोबर सकाळी ८ वाजता सुरू झाली. ४१ तासांनंतर मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे वेळापत्रक आयोगाने निश्चित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!