‘सेवा संकल्प अभियान’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०२ जणांची आरोग्य तपासणी, ५० जणांचे रक्तदान.
Oplus_131072
१५ जणांची अवयवदानासाठी नोंदणी; जिल्हाधिकारी कार्यालयातील शिबिरात आरोग्य जनजागृती

गडचिरोली, दि. २२ सप्टेंबर | सामाजिक बांधिलकी, स्वेच्छा रक्तदान आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिराला अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात १०२ जणांची आरोग्य तपासणी, तर ५० जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. आरोग्य तपासणीदरम्यान ५३ जणांचे ईसीजी, ५८ जणांची रक्त तपासणी आणि ४८ जणांची सिकलसेल तपासणी करण्यात आली.
तपासणीमध्ये पाच जणांना पूर्वीपासून उच्च रक्तदाब असल्याचे आढळले, तर आठ जणांमध्ये उच्च रक्तदाबाचा संशय व्यक्त करण्यात आला. पाच जणांना पूर्वीपासून मधुमेह असल्याचे आढळले असून, चार जणांमध्ये मधुमेहाचा संशय आढळला. दोन जणांना उच्च रक्तदाब व मधुमेह हे दोन्ही आजार पूर्वीपासून असल्याचे निदर्शनास आले, तर अन्य दोन जणांमध्ये या दोन्ही आजारांचा संशय आढळला. एका महिलेची स्तन कर्करोगविषयक तपासणीही करण्यात आली.
अवयवदानासह शासकीय योजनांची जनजागृती
आरोग्य तपासणीसोबतच विविध आरोग्य व सामाजिक योजनांची माहिती देत जनजागृती करण्यात आली. यावेळी १५ जणांनी अवयवदानासाठी नोंदणी केली, तर ५ लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले.
रक्तदान शिबिरात ४९ पुरुष आणि एका महिलेने रक्तदान केले. एकूण ५० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती
कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, उपजिल्हाधिकारी स्मिता मोरे व स्मिता बेलपत्रे, तहसीलदार संतोष आष्टीकर व संजय जयस्वाल यांच्यासह महसूल तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

