गावकऱ्यांच्या एकजुटीतून साकारले कोयनगुडा शाळेचे कौलारू शेड; ८ दिवसांच्या श्रमदानातून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर.

0
IMG-20261031-WA0299
Spread the love

भामरागड:-
​
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील उपक्रमशील मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोयनगुडा येथे शालेय उपक्रमांसाठी शेड नसल्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आता दूर झाली आहे. पुरेसा निधी उपलब्ध नसतानाही गावकऱ्यांनी एकजुटीचे दर्शन घडवत तब्बल आठ दिवस अखंड श्रमदान करून शाळेसाठी सुंदर, पारंपरिक आणि पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) कौलारू शेड उभारून दिले आहे.

​शाळेत विद्यार्थ्यांना दैनंदिन परिपाठ घेणे, वाचन करणे, माध्यान्ह भोजन आणि सायंकाळचा अभ्यास यासाठी हक्काची जागा नव्हती. शासकीय निधीची वाट न पाहता शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक गट आणि समस्त गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. शेडसाठी लागणारे लाकूड व इतर साहित्य गावकऱ्यांनी स्वतः जंगलातून व परिसरातून गोळा केले आणि पारंपरिक पद्धतीने हे शेड उभे केले. या शेडसाठी लागणाऱ्या तब्बल ८०० कौलांची व्यवस्था लोकबिरादारी प्रकल्प, हेमलकसा यांनी नाममात्र शुल्क आकारून गावकऱ्यांच्या निधीतून केली.

​हे शेड उभे राहिल्यामुळे आता विद्यार्थ्यांना उन्हा-पावसातही आपले उपक्रम, वाचन, भोजन आणि सायंकाळचा अभ्यास सुरक्षितपणे करता येत आहे. ​हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी देवराई कला ग्रामचे अध्यक्ष सुरेश पुंगाटी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास मडावी, माजी अध्यक्ष वासुदेव हबका, गावपाटील मनोहर हबका यांच्यासह गावातील तरुण व महिलांनी मोठे परिश्रम घेतले.
​गावकऱ्यांच्या या स्तुत्य व प्रेरणादायी श्रमदानाची दखल घेत भामरागडचे गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील आणि केंद्रप्रमुख जितेंद्र कोहळे यांनी कोयनगुडा ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले आहे.

निधीअभावी अडकलेली कामे लोकसहभाग आणि एकजुटीतून कशी पूर्ण करता येतात, याचा आदर्श या गावाने घालून दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!