वाघ व हत्तीच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांची माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी घेतली सांत्वन भेट.

0
IMG-20260918-WA0364
Spread the love

 

आर्थिक मदत देत कुटुंबीयांना धीर; शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही

सावली, दि. १८ सप्टेंबर २०२६ : सावली तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदत देत दुःखाच्या प्रसंगी धीर दिला.

सावली वनपरिक्षेत्रांतर्गत उपरी वनबीटातील निलसनी पेडगाव (ता. सावली) येथे दि. १६ सप्टेंबर रोजी गुरे चारण्यासाठी गेले असताना वाघाच्या हल्ल्यात वासुदेव वाकुडकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दि. १८ सप्टेंबर रोजी डॉ. अशोक नेते यांनी वाकुडकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले. तसेच कुटुंबाला आर्थिक मदत देऊन आवश्यक ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

यावेळी डॉ. नेते यांनी सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी दुर्वे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वाकुडकर कुटुंबाला देण्यात आलेल्या मदतीबाबत माहिती घेतली. कुटुंबाला तातडीने आवश्यक ती मदत देण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. तसेच परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाघाला जेरबंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही डॉ. नेते यांनी केल्या. शासनाकडून मिळणारे आर्थिक सहाय्य कुटुंबाला लवकरात लवकर मिळावे, यासाठी आपण संबंधित स्तरावर पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर सोनापूर येथील अतुल गोहने यांच्या कुटुंबीयांचीही डॉ. अशोक नेते यांनी भेट घेतली. दि. २ जुलै रोजी हत्तीच्या हल्ल्यात अतुल गोहने यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून डॉ. नेते यांनी आर्थिक मदत केली तसेच या कठीण प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी राहण्याचा विश्वास दिला.

सावली तालुक्यात वाघ, हत्ती यांसह वन्यप्राण्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने तातडीने ठोस व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली.

यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते देवरावजी मुद्दमवार, अविनाशभाऊ पाल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रोहित बोम्मावार, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर वाकुडकर, ओबीसी नेते कविंद्र रोहणकर,वनरक्षक दिलीप शेडमाके, राजेंद्र डांगे,मनोहर कुकडे, गणपत कोठारे, सुरज किनेकर, नितीन टेप्पलवार, सदानंद किनेकर, सुरेश चौधरी, संतोष पिपरे,प्रकाश नागापूरे, निलेश लोडे, तसेच मोठया संख्येने पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थिती होते.

यासोबतच डाँ. नेते यांनी सार्वजनिक गणेश मंडळ सोनापुर व सार्वजनिक गणेश मंडळ व्याहाड बुज या मंडळाला भेट देत गणपती बाप्पा चे दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!