जपतलाई आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणाला नवे वळण; विश्वजित कोवासे अखेर पोलिसांच्या ताब्यात.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी महिनाभरापासून होते फरार; न्यायालयाने २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली

प्रतिनिधी | गडचिरोली, दि. १९ सप्टेंबर : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाला शनिवारी नवे वळण मिळाले. या प्रकरणात महिनाभरापासून फरार असलेले संस्थेचे सचिव तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजित कोवासे यांनी अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले.

१० ऑगस्टच्या मध्यरात्री जपतलाई आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनी झोपलेल्या असताना विषारी सर्पदंशाची घटना घडली होती. या घटनेत दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनू कोरेटी या तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य काही विद्यार्थिनींवर उपचार करण्यात आले. या घटनेने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती.

घटनेच्या चौकशीनंतर पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे, सचिव अॅड. विश्वजित कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, अॅड. विश्वजित कोवासे आणि मारोतराव कोवासे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले. विश्वजित कोवासे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही फेटाळल्याचे सांगण्यात येते.

आत्मसमर्पणानंतर न्यायालयीन प्रक्रिया

अखेर शनिवारी विश्वजित कोवासे यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. अटकेनंतर त्यांना गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांतकुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने कोवासे यांना २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस कोठडीदरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था, वसतिगृहातील परिस्थिती, प्रशासनाची जबाबदारी तसेच घटनेपूर्वी आणि घटनेनंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत तपास केला जाण्याची शक्यता आहे.

तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?

जपतलाई आश्रमशाळेतील या दुर्घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे. तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींपैकी आणखी कोणावर कायदेशीर कारवाई होते, तपासातून कोणते पुरावे समोर येतात आणि दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कोणाची ठरते, याकडे आता गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!