गडचिरोलीत श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाला माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची उपस्थिती.
भव्य रोषणाई आणि डीजेच्या तालावर नागरिकांची गर्दी
गडचिरोली, दि. ०५ सप्टेंबर २०२६ :
श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती तथा सकल विश्व हिंदू समाज, गडचिरोली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन चंद्रपूर रोड,गडचिरोली येथील अभिनव लॉन येथे करण्यात आले. सन २०११ पासून अविरतपणे सुरू असलेल्या या परंपरेचे यंदाही अत्यंत उत्साही, मंगलमय आणि भव्य वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
या दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन तसेच दहीहंडीचे पूजन करून अत्यंत भक्तिभावाने करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “या ठिकाणी दरवर्षी दहीहंडीचा उत्सव अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. मी दरवर्षी या उत्सवात आवर्जून सहभागी होत असतो. गडचिरोलीतील नागरिकांचा उत्साह कौतुकास्पद आहे. मी सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो,” असे प्रतिपादन मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी केले.
याप्रसंगी आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, नगरपरिषद उपाध्यक्ष निखिल चरडे, ज्येष्ठ नेते प्रमोदजी पिपरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, सकल विश्व हिंदू परिषदेचे नेते रामायणजी खटी,पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण साहेब, भाजपाचे युवा नेते घनश्याम वाढई, पत्रकार तिलोतमा हाजरा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे आयोजक अनिल तिडके, बंटी भाऊ उर्फ निकेश खडसे, परमानंद पुण्यपवार,अनुराग पिपरे,केशव मडावी, सागर सोनटक्के, राकेश नैताम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने केले होते. अभिनव लॉन परिसरात करण्यात आलेली भव्य-दिव्य व आकर्षक रोषणाई तसेच डीजेच्या तालावर ठेका धरणाऱ्या गोविंदा तरुणांमुळे संपूर्ण परिसर उत्सवाच्या रंगात रंगून गेला होता.
