दुर्गम भागातील बालकांसाठी ४५ समुदायाधारित पाळणाघरे; पैमा येथे पहिल्या केंद्राचे उद्घाटन
Oplus_131072
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ; बुर्गी, तोडसा व नागुलवाहीतील विकासकामांचीही पाहणी
गडचिरोली, दि. ४ सप्टेंबर : जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना पोषण, आरोग्य, सुरक्षित संगोपन तसेच प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात ४५ समुदायाधारित पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमातील पहिल्या पाळणाघराचा शुभारंभ एटापल्ली तालुक्यातील पैमा येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी पंडा यांच्या क्षेत्रीय दौऱ्यात विविध विकासकामांचीही पाहणी करण्यात आली. बुर्गी येथील जिल्हा परिषद शाळेत डीएमएफ निधीतून सुरू असलेल्या कामांची पाहणी करून त्यांनी कामाची सद्यस्थिती व प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर तोडसा येथील शासकीय आश्रमशाळेतील नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करत विद्यार्थिनींशी संवाद साधला.
तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रालाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन दुर्गम भागातील नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या आरोग्यसेवा, औषधसाठा आणि इतर सुविधांची माहिती घेतली. नागुलवाही येथील रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेचीही तपासणी करण्यात आली.
बालकांच्या पोषणासह मातांना रोजगारासाठी आधार
जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभाग, महाम शासन आणि टाटा ट्रस्ट्स यांच्या सामंजस्य करारातून ‘बाल पोषण व विकास उपक्रम’ राबविण्यात येत आहे. टाटा ट्रस्ट्सच्या सहकार्याने ‘मोबाईल क्रेचेस फॉर वर्किंग मदर्स चिल्ड्रेन’ संस्थेमार्फत एटापल्ली तालुक्यात या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.
पाळणाघरांमध्ये बालकांना पोषक व वैविध्यपूर्ण आहार, स्वच्छता व आरोग्याची काळजी तसेच वयानुरूप प्रारंभिक विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बालसंगोपनाची सुविधा गावाजवळ उपलब्ध झाल्यामुळे मातांना रोजगार, उपजीविका आणि इतर जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक वेळ मिळणार आहे.
दुर्गम गावांतील बालकांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजाचे मोठे प्रमाण असून एटापल्ली तालुक्यात १९७ हून अधिक गावे आहेत. यातील अनेक गावे दुर्गम व वनबहुल भागात असल्याने आरोग्य, पोषण आणि बालविकासाच्या सेवा पोहोचविताना भौगोलिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे समुदायस्तरावरच बालसंगोपन आणि पोषणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी, “भौगोलिक दुर्गमतेमुळे कोणतेही बालक आरोग्यसेवा, पुरेसे व वैविध्यपूर्ण पोषण तसेच सुरक्षित संगोपनापासून वंचित राहू नये. या भागीदारीतून बालकांच्या सुदृढ भविष्यासाठी मजबूत पाया निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,” असे सांगितले.
टाटा ट्रस्ट्सच्या न्यूट्रिशन विभागाच्या प्रमुख जयीता चौधरी यांनी बालकांच्या आयुष्यातील पहिले एक हजार दिवस शारीरिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पाळणाघरांतील बालकांना अंगणवाडी व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी जोडून आवश्यकतेनुसार वेळेत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे.
मोबाईल क्रेचेसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित्रा मिश्रा यांनीही दुर्गम भागातील बालकांपर्यंत दर्जेदार पोषण आणि प्रारंभिक बालसंगोपनाच्या सुविधा पोहोचविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे नमूद केले.
४५ पाळणाघरे टप्प्याटप्प्याने सुरू होणार
पैमा येथे सुरू झालेले केंद्र हे जिल्ह्यातील या उपक्रमातील पहिले समुदायाधारित पाळणाघर ठरले आहे. नियोजित उर्वरित ४४ पाळणाघरे येत्या काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली अमर राऊत, उपविभागीय अधिकारी भामरागड शुभम पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी अजय डोके, टाटा ट्रस्ट्सच्या जयीता चौधरी, निलेश यादव, तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांच्यासह महिला व बालविकास, महसूल, आरोग्य आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
