तीन वर्षांचा न्यायालयीन वाद संपला; अतुल गण्यारपवार पुन्हा बाजार समितीच्या सभापतीपदी.

0
IMG-20260904-WA0318
Spread the love

चामोर्शी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावरून गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन वादाला अखेर पूर्णविराम मिळाला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी (४ सप्टेंबर) झालेल्या विशेष सभेत अतुलभाऊ गण्यारपवार यांची सभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांनी सभापतीपदाचा पदभार स्वीकारला.

सभापतीपदाच्या निवडीसाठी सहाय्यक निबंधक तथा निवडणूक अधिकारी एस. बी. सहारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी अतुल गण्यारपवार यांच्या उमेदवारीबाबत उपस्थित संचालकांकडून आक्षेप मागविण्यात आले. मात्र, कोणत्याही संचालकाने आक्षेप नोंदविला नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची सभापतीपदी अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

न्यायालयीन लढाईनंतर मिळाला दिलासा

सुमारे तीन वर्षांपूर्वी बाजार समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी अतुल गण्यारपवार यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज खारीज केला होता. या निर्णयाला गण्यारपवार यांनी नागपूर खंडपीठातील उच्च न्यायालयात आव्हान दिले.

या प्रकरणात तब्बल तीन वर्षे न्यायालयीन लढाई सुरू राहिली. अखेर १७ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने तत्कालीन निर्णयाला धक्का देत गण्यारपवार यांचा खारीज केलेला अर्ज ग्राह्य धरला. या निर्णयामुळे त्यांच्या सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा निबंधक यांच्या आदेशाने शुक्रवारी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. सभापतीपदासाठी अतुल गण्यारपवार यांचा एकमेव अर्ज असल्याने आणि संचालकांकडून कोणताही आक्षेप नसल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.

पदभार स्वीकारताच समर्थकांमध्ये उत्साह

अविरोध निवड जाहीर झाल्यानंतर अतुल गण्यारपवार यांनी सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. तीन वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर पुन्हा सभापतीपदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

दरम्यान, बाजार समितीतील रखडलेली कामे, शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न आणि बाजार समितीच्या प्रशासकीय कामकाजाला आता गती मिळेल, अशी अपेक्षा संचालक व शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. न्यायालयीन वादाचा अध्याय संपल्याने बाजार समितीच्या कामकाजाला स्थैर्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!