पेंढरी–गट्टा–जरावंडी परिसरात नरभक्षी वाघाचा धुमाकूळ; तातडीने बंदोबस्त करा.
Oplus_131072
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील पेंढरी, गट्टा, जरावंडी व परिसरातील गावांमध्ये नरभक्षी वाघाचा वाढता वावर नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरत आहे. वाघाच्या वारंवार होणाऱ्या दर्शनामुळे तसेच नागरिक व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्य वनसंरक्षकांची भेट घेऊन वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघाचा वावर वाढला असून पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटनांमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी, शेतमजूर तसेच जंगलालगतच्या गावातील नागरिकांना शेतात जाणे, जनावरांची देखभाल करणे आणि दैनंदिन कामे करणेही धोकादायक बनले आहे.
वनविभागाकडून या परिस्थितीवर तातडीने प्रभावी उपाययोजना होणे आवश्यक असताना अपेक्षित कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. “प्रशासन आणखी एखाद्या नागरिकाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
निवेदनातून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष वनपथक तैनात करावे, गाव परिसरात नियमित गस्त वाढवावी, नागरिकांना सुरक्षा सूचना द्याव्यात आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
येत्या पाच दिवसांत पेंढरी–गट्टा–जरावंडी परिसरातील धोकादायक वाघावर प्रभावी नियंत्रण मिळवावे; अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, नगरसेवक सतीश विधाते, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, संजय गावडे व विनोद लेनगुरे उपस्थित होते.


