मुरखळाचक येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; एकाच पहाटे सात जणांवर हल्ला.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार; सिरम उपलब्ध नसल्याने जखमींना गडचिरोलीला हलविले

चामोर्शी, दि. २० सप्टेंबर : तालुक्यातील मुरखळाचक येथे पिसाळलेल्या कुत्र्याने पहाटेच्या सुमारास धुमाकूळ घालत एकापाठोपाठ सात जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कुत्र्याच्या हल्ल्यात सात नागरिक जखमी झाले आहेत.

या घटनेत विलास रामदास रोहनकर (५२), धनराज रोहनकर (७८), पत्रुजी किसन घोडे (६५), मयूर गिरीधर शेंद्रे (२४), ध्रुव तुकाराम ठेमसकर (५४), शामराव बालाजी कुणघाटकर (५५) आणि शिलाबाई डोमु गोवर्धन (४०) हे मुरखळाचक येथील रहिवासी जखमी झाले.

कुत्र्याने अचानक हल्ला केल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मयंक करमणकर यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. सर्व जखमींना अँटी-रेबीज लस देण्यात आली.

मात्र, ग्रामीण रुग्णालयात रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (सिरम) उपलब्ध नसल्याने सातही जखमींना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. आवश्यक सिरम उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना गडचिरोली येथे रेफर करावे लागल्याची माहिती डॉ. मयंक करमणकर यांनी दिली.

सिरम उपलब्ध नसल्याने आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह

चामोर्शी हा जिल्ह्यातील मोठ्या तालुक्यांपैकी एक असून ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक उपचारासाठी येतात. अशा परिस्थितीत कुत्रा चावण्यासारख्या तातडीच्या आरोग्यविषयक घटनांमध्ये आवश्यक रेबीज सिरम उपलब्ध नसणे ही बाब चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कुत्र्याच्या चाव्याच्या उपचारासाठी नागरिकांना गडचिरोलीपर्यंत धाव घ्यावी लागू नये, यासाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात अँटी-रेबीज लसीसोबत आवश्यक रेबीज इम्युनोग्लोब्युलिनचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

दरम्यान, मुरखळाचक परिसरात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!