गोंदिया-बल्लारशाह रेल्वेच्या विलंबावर खासदार किरसान आक्रमक; गडचिरोलीत बँकांमध्ये तिकीट आरक्षणाची मागणी.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी नागपूर मंडळाच्या बैठकीत प्रवाशांच्या प्रश्नांवर प्रशासनाला धरले धारेवर

 

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळासोबत झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. गोंदिया-बल्लारशाह रेल्वे नियमित व निर्धारित वेळेनुसार चालविण्यासह गडचिरोली शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये रेल्वे तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

गोंदिया-बल्लारशाह रेल्वेच्या विलंबाचा प्रश्न

गोंदिया-बल्लारशाह रेल्वे अनेकदा निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच नियमित प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा डॉ. किरसान यांनी बैठकीत मांडला. रेल्वेच्या विलंबामुळे प्रवाशांचे दैनंदिन वेळापत्रक विस्कळीत होत असल्याने गाडी वेळेत धावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

गडचिरोलीत तिकीट आरक्षणाची सुविधा वाढवा

गडचिरोली शहरात रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नागरिकांना सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये अनेक अडचणी येत असल्याचेही त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. तिकीट आरक्षणासाठी नागरिकांना गर्दी व वेळेचा सामना करावा लागत असल्याने गडचिरोली शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये रेल्वे तिकीट आरक्षणाची सुविधा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

या सुविधेमुळे नागरिकांना शहरातच तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध होऊन प्रवाशांची धावपळ कमी होण्यास मदत होईल, असे डॉ. किरसान यांनी स्पष्ट केले.

स्थानकांवरील मूलभूत सुविधांकडेही लक्ष

मतदारसंघातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर आवश्यक गाड्यांना थांबे देण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. यासोबतच स्थानकांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रवासी निवारा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच रेल्वे स्थानकांच्या विकास व आधुनिकीकरणाचा मुद्दाही मांडण्यात आला.

गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील नागरिकांसाठी रेल्वे वाहतूक ही महत्त्वाची सार्वजनिक सेवा असून, प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केली.

या बैठकीला खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्यासह रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, खासदार राजेंद्रजी जैन, खासदार मायाताई इवनाते, बालाघाटच्या खासदार भारती पारधी तसेच नागपूर मंडळाच्या कार्यक्षेत्रातील अन्य संसद सदस्य आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!