सायबर फसवणुकीपासून सावध राहा; विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करावा — पोलीस निरीक्षक दीपक डोंब.
Oplus_131072
कोरचीत पारबताबाई विद्यालयात पोलीस विभागाकडून सायबर सुरक्षा मार्गदर्शन
कोरची : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबत इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करताना सतर्कता आणि जबाबदारी बाळगावी, असे आवाहन कोरची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी केले.
पारबताबाई विद्यालय, कोरची आणि कोरची पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोनल बल्लाळ आणि पोलीस हवालदार नाजिया शेख यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच शालेय सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
ओटीपी, पासवर्ड शेअर करू नका
गुगल, ई-मेल, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करताना विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर करणे, संशयास्पद लिंकवर क्लिक करणे, अपरिचित व्यक्तींशी संपर्क साधणे तसेच पासवर्ड किंवा ओटीपी इतरांना सांगणे टाळावे. अशा निष्काळजीपणामुळे सायबर फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कोणतीही संशयास्पद बाब, ऑनलाइन फसवणूक किंवा त्रासदायक संदेश आढळल्यास ती बाब लपवून न ठेवता तत्काळ पालक, शिक्षक किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणावी, असेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
‘गुड टच-बॅड टच’सह महिला सुरक्षेचे धडे
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गुड टच-बॅड टच, महिला अत्याचार प्रतिबंध, महिला सुरक्षा, सायबर कायदे व नियम आणि शालेय सुरक्षा या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल जगाचा सुरक्षित वापर करताना विद्यार्थ्यांनी स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता जपावी, यावर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षक गुरनुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक चौधरी यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सायबर फसवणुकीपासून सावध राहा; कोरचीत विद्यार्थ्यांना पोलिसांचे सुरक्षा धडे
