कुरखेड्यात सरपंच-उपसरपंचांचे उपोषण १६व्या दिवशीही सुरू; मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.
Oplus_131072
सहाय्यक गटविकास अधिकारी देवांश उराडे यांच्या निलंबनाची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेससह शेकडो कार्यकर्त्यांचा आंदोलनाला पाठिंबा
कुरखेडा | गडचिरोली : तालुक्यातील सरपंच व उपसरपंच संघटनेच्या वतीने सहाय्यक गटविकास अधिकारी देवांश उराडे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण रविवारी सोळाव्या दिवशीही सुरूच होते. मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत त्यांच्या कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्याध्यक्ष नंदू नरोटे, बुभामली भिंगर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच तसेच संघटनेचे पदाधिकारीही आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.
मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यासंदर्भात आंदोलनकर्त्यांनी धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी संपर्क साधून मुंबई गाठण्याची तयारी दर्शविली आहे.
सोळा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनावरही निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे. आता प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे कुरखेडा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
