पोहर नदीवरील पुलाचा रखडलेला मार्ग; खड्ड्यांतून जीवघेणा प्रवास,वर्तमानपत्रांतून वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाचा कानाडोळा.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

मोठा पूल तयार होऊन वर्ष लोटले, तरी वाहतूक सुरळीत नाही; प्रशासन-कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे वाहनधारक त्रस्त

चामोर्शी : चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील पोहर नदीवरील जुना ठेंगणा पूल पावसाळ्यात वारंवार पाण्याखाली जात असल्याने त्याला पर्याय म्हणून शेजारी मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र, पुलाचे काम पूर्ण होऊन वर्ष लोटले तरी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने वाहतूक सुरळीत होऊ शकलेली नाही. परिणामी वाहनधारकांना मोठमोठ्या खड्ड्यांतून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

नवीन पुलाच्या समोरील रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आल्याने या मार्गावर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून शेकडो ट्रक तसेच अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून वाहनधारकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

नवीन पुलाकडे जाणारा मार्ग सुरळीत नसल्याने अनेक वाहने आजही जुन्या पुलाचा वापर करीत आहेत. मात्र, जुना पूलही वाहतुकीसाठी योग्य स्थितीत नसल्याने नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यास जुन्या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक ठरू शकते.

वर्तमानपत्रांतून वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाचा कानाडोळा

पोहर नदीवरील पुलाच्या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी तसेच माध्यमांनी प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले आहे. मात्र, अद्यापही संबंधित प्रशासन आणि कंत्राटदाराकडून ठोस उपाययोजना झालेली दिसून येत नाही. रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून खड्डे बुजविणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

अर्धवट रस्त्यामुळे दररोज वाहनधारकांना धोकादायक परिस्थितीतून मार्गक्रमण करावे लागत आहे. दुचाकीस्वार, चारचाकी वाहनधारक तसेच अवजड वाहन चालकांसाठी हा मार्ग मोठे आव्हान ठरत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे.

मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?

प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही रस्त्याची डागडुजी किंवा अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी हालचाली होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. “एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

संबंधित कंत्राटदाराने पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, तोपर्यंत धोकादायक खड्ड्यांची डागडुजी करावी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!