गणपूर-जयरामपूर बससेवेसाठी ६४ विद्यार्थ्यांचा एल्गार; आमदार नरोटेंना निवेदन.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

बसच्या अनियमित फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; नियमित सेवा सुरू करण्याची मागणी

 

गडचिरोली/चामोर्शी, दि. २ सप्टेंबर : ग्रामीण भागातून चामोर्शी येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत गणपूर-जयरामपूर मार्गावरील एसटी बससेवा नियमित करण्यासाठी ६४ विद्यार्थ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. बससेवा वेळेत व सुरळीत सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी बुधवारी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या चामोर्शी येथील कार्यालयात धाव घेत निवेदन साद केले.

गणपूर-जयरामपूर परिसरातील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी चामोर्शी येथे ये-जा करतात. मात्र, एसटी बसच्या अनियमित फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना बसस्थानकावर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने शाळा व महाविद्यालयात पोहोचण्यास विलंब होण्याबरोबरच शिक्षणानंतर गावाकडे परतताना देखील विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी १ सप्टेंबर रोजी चामोर्शी बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले होते. मात्र, आंदोलनानंतरही बससेवेचा प्रश्न कायम राहिल्याने विद्यार्थ्यांनी आता लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली आहे.

मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांच्या माध्यमातून आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना विद्यार्थ्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यालय प्रमुख विनोद किरमे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकाचा विचार करून गणपूर-जयरामपूर मार्गावरील एसटी बसच्या फेऱ्यांच्या वेळेत आवश्यक बदल करावेत, तसेच विद्यार्थ्यांना सोयीची आणि नियमित बससेवा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला

बससेवेतील अनियमिततेचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याने हा प्रश्न केवळ वाहतुकीचा नसून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने पाहून तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

निवेदन देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्नेहल एकनाथ वेलमाटे, सायली संजय वाडपल्लीवार, सायली नाथ हंडेकर, प्रणय हेमकळ कुस्तुरे, रोहित बंडू पुडेलवार, संकेत सुनील हंडेकर, चुलबीराम एखामकर साडे यांच्यासह एकूण ६४ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

“बससेवा सुरळीत करा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा!” अशी मागणी आता जोर धरत असून, आमदार व प्रशासन या प्रश्नावर कोणता निर्णय घेतात, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!