५६ रुग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया; रक्तदान, नेत्रतपासणीपासून वृक्षारोपणापर्यंत समाजसेवेचा जागर.
Oplus_131072
६७ रक्तदात्यांनी केले रक्तदान; ४३० नागरिकांची नेत्र तपासणी
गडचिरोली/चामोर्शी : सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांच्या पुढाकारातून चामोर्शी शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. रक्तदान, मोतीबिंदू व नेत्र तपासणी, वृक्षारोपण, फळवाटप तसेच गरजू नागरिकांना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप अशा विविध उपक्रमांतून सामाजिक सेवेचा संदेश देण्यात आला.
चामोर्शी येथील गण्यारपवार फाउंडेशन, नागपूर येथील महात्मे नेत्र रुग्णालय आणि शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान व नेत्रतपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ६७ रक्तदात्यांनी रक्तदान, तर तब्बल ४३० नागरिकांनी मोतीबिंदू व नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
नेत्र तपासणीदरम्यान मोतीबिंदू आढळलेल्या ५६ रुग्णांची पुढील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून, या रुग्णांवर नागपूर येथील महात्मे नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमूचे सहकार्य
रक्तदान शिबिरासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. नागेश शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तकेंद्र तंत्रज्ञ राहुल सिडाम, प्रयोगशाळा सहाय्यक नयनतारा मोहुर्ले, अधिपरिचारिका शिल्पा मेश्राम, सहाय्यक राजकुमार भगत, बंडू कुंभारे, तन्वी मंगरे, भाविका लोंढे, समीक्षा धोडरे आदींनी सहकार्य केले. नेत्र तपासणीसाठी डॉ. अरविंद डोंगरवार यांच्यासह त्यांच्या चमूने सेवा बजावली.
आरोग्यसेवेपलीकडे सामाजिक उपक्रमांची जोड
सामाजिक उपक्रमांची व्याप्ती केवळ आरोग्य शिबिरापुरती मर्यादित न ठेवता तालुक्यात विविध ठिकाणी उपक्रम राबविण्यात आले. आमगाव महाल येथे उपसरपंच विनोद शेंगर यांच्या पुढाकाराने निराधार नागरिकांना जीवनोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. घोट येथे वृक्षारोपणासह रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
चामोर्शीतील मतिमंद निवासी शाळेत विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच मोहोली व मुरखळा परिसरात वृक्षारोपण आणि फळझाडांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
रक्तदानातून गरजू रुग्णांना मदत, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेतून दृष्टी परत मिळविण्याचा प्रयत्न आणि वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन, अशा विविध माध्यमांतून या उपक्रमांनी समाजसेवेचा व्यापक संदेश दिला.
या उपक्रमांना अमोल गण्यारपवार, अजिंक्य गण्यारपवार, जय गण्यारपवार, मधुकर चिंतलवार, रुपाली दहेलकर, भाग्यश्री चिंतलवार, मुरलीधर बुरे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वाढदिवस अथवा वैयक्तिक आनंदाचा क्षण केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो समाजोपयोगी कार्यासाठी समर्पित करण्याचा उपक्रम चामोर्शी तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
