बुद्धगिरी टेकडी वर्धापन दिनानिमित्त सकल बौद्ध समाज ग्रामीण संघटनेचा स्तुत्य उपक्रम.

0
IMG-20261105-WA0043
Spread the love

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान; ‘बाबासाहेबांनी धर्मांतर का?’ पुस्तकाच्या ३०० प्रतींचे वितरण

मूल : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील जंगलातील टेकडीवर २१ वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आढळून आली होती. तेव्हापासून दरवर्षी ४ नोव्हेंबर रोजी बुद्धगिरी टेकडीवर जिल्हाभरातील लाखो अनुयायी एकत्र येऊन वर्धापन दिन साजरा करतात. यंदाच्या २२ व्या बुद्धगिरी टेकडी वर्धापन दिनाचे औचित्य साधून सकल बौद्ध समाज ग्रामीण संघटना, मूल तालुका यांच्या वतीने विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले.

या कार्यक्रमात मूल तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. मुरलीधर जनार्धन डोहणे (रा. चिचाळा) तसेच डोंगरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मा. प्रभाकर गोवर्धन यांचा सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षा सोहळ्यानंतर देण्यात आलेल्या ‘बाबासाहेबांनी धर्मांतर का?’ या पुस्तकाच्या ३०० प्रतींचे उपस्थितांना वितरण करण्यात आले. त्याचबरोबर सकल बौद्ध समाज ग्रामीण संघटनेची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक उद्दिष्टे स्पष्ट करणाऱ्या माहितीपत्रकांचेही वाटप करण्यात आले.

संघटनेच्या अध्यक्षांनी संघटनेची ध्येय-धोरणे आणि मूल तालुक्यात भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटनात्मक एकजूट, शिक्षण, सामाजिक जागृती आणि वैचारिक प्रबोधन आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमात रमाई भजन मंडळ, आदर्शखेडा (मारोडा) यांच्या संचाने सादर केलेल्या भीम-बुद्ध भजनगीतांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. भजनांच्या माध्यमातून महामानवांच्या विचारांचा जागर करण्यात आला.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सकल बौद्ध समाज ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष टेवनंद भसारकर, उपाध्यक्ष विजय दुर्गे, दौलत रामटेके, सचिव कैलास खोबरागडे, कोषाध्यक्ष प्रदीप लाकडे (गडीसुर्ला) तसेच भीमराव कोसनकर, अविनाश टेकरे, पाटील वाळके, अंगरेश मेश्राम, कुसुमताई मेश्राम यांच्यासह संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पंकज गेडाम सर यांनी केले. बुद्धगिरी टेकडी वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीसोबतच वैचारिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!