बससेवेच्या अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचा चामोर्शी बसस्थानकावर रास्ता रोको; पो.नि. ढाकणे यांच्या मध्यस्थीने आंदोलनाची सांगता.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

गणपूर-जयरामपूर मार्गावरील एसटी फेऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

गडचिरोली/चामोर्शी, दि. १ सप्टेंबर : गणपूर-जयरामपूर मार्गावरील एसटी बससेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी चामोर्शी बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले. निर्धारित वेळेत बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला. अखेर सुमारे अर्धा तास चाललेल्या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष विद्यार्थ्यांच्या समस्येकडे वेधले गेले.

गणपूर, जयरामपूर तसेच परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज चामोर्शी येथे ये-जा करतात. अनेक विद्यार्थी सकाळी लवकर शाळेत दाखल होतात. मात्र शाळा सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी अपेक्षित असलेली साडेबारा वाजताची बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले. दुपारी दोन वाजताची बसफेरीही नियमितपणे होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली होती.

“सकाळी उपाशीपोटी सहा वाजता शाळेत येतो; मात्र शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बस वेळेवर मिळत नाही. बस येत नाही, विद्यार्थ्यांना घेण्यात येत नाही, मग आम्ही काय करायचे?” असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

बससेवेच्या अनियमिततेला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी बसस्थानक परिसरात एकत्र येत वाहतूक रोखली. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा पाहता प्रशासनाने तातडीने दखल घेतली.

दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच चामोर्शीचे पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले.

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध करून देण्यात आली. बस मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. त्यामुळे परिस्थिती निवळली आणि वाहतूक पूर्ववत झाली.

बसफेऱ्या नियमित करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बससेवा ही शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बसफेऱ्या अनियमित झाल्यास त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीवर होतो. त्यामुळे गणपूर-जयरामपूर मार्गावरील सर्व बसफेऱ्या निर्धारित वेळेनुसार नियमित सुरू ठेवाव्यात, विद्यार्थ्यांना प्रवासात प्राधान्य द्यावे आणि कोणतीही बसफेरी अचानक रद्द होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

पोलिसांच्या तातडीच्या मध्यस्थीमुळे मंगळवारचा प्रश्न तूर्तास मार्गी लागला असला तरी एसटी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करून बससेवा नियमित न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता एसटी प्रशासन या प्रश्नावर काय निर्णय घेते, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!