युआयटीच्या पहिल्या बॅचने कामगिरीतून संस्थेची नवी ओळख निर्माण करावी : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

दीक्षा आरंभ’ कार्यक्रमात बी.टेक. विद्यार्थ्यांना आवाहन; उद्योगांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी दोन महिन्यांची इंटर्नशिप

गडचिरोली, दि. १ : गोंडवाना विद्यापीठ संचलित युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (युआयटी), गडचिरोलीच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांवर संस्थेची भविष्यातील ओळख घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, रोजगारातील यश आणि विविध क्षेत्रांतील कामगिरीच युआयटीची प्रतिष्ठा निर्माण करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्ये आणि आत्मविश्वास विकसित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

युआयटीमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘दीक्षा आरंभ’ (इंडक्शन प्रोग्रॅम) कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, युआयटीचे प्रभारी मनीष उत्तरवार, लॉयड्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय गुप्ता यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

बारावीनंतर व्यावसायिक शिक्षणात प्रवेश हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व करिअरच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले. युआयटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक व व्यावहारिक शिक्षणासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले असून, चार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून त्यांना भविष्यातील करिअरसाठी सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दोन महिन्यांच्या इंटर्नशिपमधून उद्योगांचा अनुभव

युआयटीच्या चार वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत दोन महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे उद्योगांमधील प्रत्यक्ष कामकाज, तांत्रिक प्रक्रिया आणि व्यावसायिक कार्यसंस्कृती समजून घेण्यास विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.

लॉयड्ससह विविध कंपन्या आणि उद्योगांमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे केवळ पदवी मिळविण्यावर भर न देता उद्योगांच्या गरजा ओळखून त्यानुसार तांत्रिक व व्यावहारिक कौशल्ये विकसित करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

पहिल्या बॅचवर संस्थेच्या प्रतिष्ठेची जबाबदारी

युआयटीच्या पहिल्या बॅचला विशेष महत्त्व असून, या विद्यार्थ्यांची कामगिरी पुढील बॅचसाठी मापदंड ठरणार आहे. शैक्षणिक प्रगती, रोजगार, विविध क्षेत्रांतील यश आणि उपलब्धी यामुळे संस्थेची ओळख निर्माण होईल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या प्रगतीसोबत संस्थेच्या प्रतिष्ठेतही भर घालण्याचे ध्येय ठेवावे, असे पंडा यांनी सांगितले.

येत्या पाच वर्षांत युआयटीने गडचिरोलीसह परिसरातील एक प्रतिष्ठित तंत्रशिक्षण संस्था म्हणून नावलौकिक मिळवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थी, शिक्षक, विद्यापीठ, उद्योग आणि प्रशासन यांच्या समन्वयातून संस्थेच्या विकासाला गती देता येईल, असे त्यांनी नमूद केले.

राज्यस्तरीय कामगिरीबद्दल मोनिका मडावीचा गौरव

कार्यक्रमात लॉयड्स स्पोर्ट्स ॲकॅडमीची खेळाडू मोनिका सानू मडावी हिचा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. ४० व्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील २० वर्षांखालील गटात मोनिकाने पोल व्हॉल्टमध्ये सुवर्णपदक, तर उंच उडीत रौप्यपदक पटकावले आहे. पोल व्हॉल्टमध्ये सुवर्णपदक मिळविणारी ती गडचिरोली जिल्ह्यातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

मोनिकाच्या यशाचे कौतुक करत जिल्हाधिकारी पंडा यांनी गडचिरोलीतील खेळाडूंमध्ये मोठी क्षमता असल्याचे सांगितले. लॉयड्स फाउंडेशनकडून खेळाडूंना प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला.

गडचिरोली शहरात सुसज्ज ॲथलेटिक ट्रॅक उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, क्रीडा संकुल, कबड्डी व खो-खो मैदाने तसेच खेळाडूंसाठी वसतिगृहासह आवश्यक सुविधा विकसित करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

‘दीक्षा आरंभ’ कार्यक्रमात नवप्रविष्ट विद्यार्थ्यांना युआयटीचा अभ्यासक्रम, शैक्षणिक व्यवस्था, उपलब्ध सुविधा, व्यावहारिक प्रशिक्षण आणि भविष्यातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!