जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचे मार्कंडेश्वराला साकडे; ७ सप्टेंबरला महाअभिषेकाचे आयोजन
Oplus_131072
मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांची भूमिका ऐकावी, महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन
चामोर्शी, दि. ३० ऑगस्ट : हिरापूर, राखी, गुरवळा प्रस्तावित विमानतळ तसेच जयरामपूर-मुधोली परिसरातील १३ गावे आणि भेंडाळा परिसरातील १४ गावांतील जमीन अधिग्रहणाच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता ‘विदर्भाची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराच्या चरणी साकडे घालण्याचा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७ ऑगस्ट रोजी मार्कंडादेव येथे महाअभिषेकाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली.
मार्कंडादेव येथील जगन्नाथ बाबा मंदिरात रविवारी शेतकऱ्यांची नियोजन बैठक व पत्रकार परिषद पार पडली. यावेळी प्रस्तावित जमीन अधिग्रहणामुळे संबंधित गावांतील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषावर चर्चा करण्यात आली.
“जमीन अधिग्रहण न करता शेतकऱ्यांना न्याय द्या,” अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि त्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी पर्यायी मार्ग काढावा, अशी भूमिका शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी मांडली.
“गडचिरोली जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आम्ही मार्कंडेश्वराच्या चरणी साकडे घालणार आहोत. मात्र, सरकार अद्यापही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी साधी चर्चाही होत नाही,” असा संताप ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे आणि प्रस्तावित जमीन अधिग्रहणातून शेतकऱ्यांच्या जमिनी वाचाव्यात, या मागणीसाठी महाअभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी स्वतः मार्कंडादेव येथे उपस्थित राहून शेतकऱ्यांची भूमिका ऐकावी, असे निमंत्रण शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात येणार असल्याचेही ब्राह्मणवाडे यांनी सांगितले.
या महाअभिषेक कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.
यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद भगत, नगरसेवक सुमेध तुरे, सोशल मीडिया प्रमुख विजय लाड, काँग्रेस चामोर्शी शहराध्यक्ष विलास चिचघरे, अमर मोगरे, संजय बुरांडे, लीलाधर सुरजागडे, दिवाकर निसार, गुरुदास ठुसे, नरेंद्र कोठारे, मुखरू शेंडे, वसंत बुरमवार, तात्याजी चिचघरे, नदीम नाथानी, सुनील कोहपरे, नेताजी गावतुरे, नुमचंद भिवणकर, अभिषेक रोहनकर, नीलकंठ हजारे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
