वैनगंगेच्या सीमेवरून जिल्ह्यात बिनदिक्कत दारू तस्करीचा ‘खेळ’!
Oplus_131072
वैनगंगेच्या सीमेवरून जिल्ह्यात बिनदिक्कत दारू तस्करीचा ‘खेळ’!
चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी, सावली व गोंडपिंपरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर दारू पुरवठा; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गडचिरोली:-
एका बाजूला दारूबंदी असलेला गडचिरोली जिल्हा आणि दुसऱ्या बाजूला दारूची दुकाने असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्ती तालुके, अन् यांच्या मधोमध वाहणारी वैनगंगा नदी! दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू पोहोचवण्यासाठी या नदीकाठच्या भौगोलिक परिस्थितीचा मोठ्या प्रमाणावर गैरफायदा घेतला जात आहे. त्यामुळे ‘वैनगंगा नदी वाहते की दारू?’ असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे. —
–भौगोलिक रचनेचा गैरफायदा आणि तस्करीचे जाळे.
गडचिरोली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी लागू आहे. व्यसनमुक्त समाज निर्माण करणे हा यामागचा मूळ उद्देश असला, तरी प्रत्यक्षात जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून अवैध दारूचा पुरवठा सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, ब्रह्मपुरी आणि गोंडपिंपरी या तालुक्यांमधील काही भागांतून गडचिरोलीकडे मोठ्या प्रमाणावर दारू जात असल्याची परिसरातील नागरिकांची नेहमीच ओरड असते .वैनगंगा नदीच्या एका तीरावर चंद्रपूर तर दुसऱ्या तीरावर गडचिरोली जिल्हा अशी या परिसराची भौगोलिक रचना आहे. रस्ते आणि नदीपात्रातले मार्ग तसेच ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांचा वापर करून अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याचे सांगितले जाते. या व्यवहारात किरकोळ विक्रेत्यांपासून ते मोठ्या तस्करांपर्यंतचे मोठे जाळे सक्रिय असल्याची चर्चा आहे.
-‘स्रोत’ कुणीकडे? पोलिसांच्या नजरेतून कशी सुटते दारू?
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारूचा पुरवठा करणाऱ्या साखळीतील मूळ ‘स्रोत’ नेमका कुणीकडे आहे? दारू कुठून निघते, कोणत्या मार्गाने जाते, आणि ती गडचिरोलीपर्यंत पोलिसांच्या नजरेतून कशी सुटते, असे अनेक गंभीर सवाल आता उपस्थित होत आहेत.
माहिती असूनही कारवाई का होत नाही? एखाद्या मार्गातून सातत्याने अवैध दारू जात असल्याची पक्की माहिती असूनही ती पकडली जात नाही, यामागे मोठे अर्थकारण दडल्याची चर्चा आहे. वैनगंगा नदीच्या एका तीरावर कायदेशीर दारू विक्री आणि दुसऱ्या तीरावर पूर्ण दारूबंदी, या दोन व्यवस्थेमधील दरीचा फायदा घेऊन नेमकी कोणाची चांदी होत आहे, याचा शोध घेणे आता गरजेचे बनले आहे.
कारवाईची जबाबदारी कोणाची?
अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती जर स्थानिक पातळीवर उपलब्ध असेल, तर त्यावर प्रभावी कारवाई करण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. मात्र, या सीमावर्ती भागातील कथित तस्करीच्या मार्गावर सातत्याने दुर्लक्ष का केले जाते, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत
